संयुक्त राष्ट्र
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेला भीषण दहशतवादी हल्ला हा 'अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' (AQIS) या दहशतवादी संघटनेने घडवला होता, अशी अधिकृत नोंद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) दहशतवादविरोधी निर्बंध मॉनिटरिंग बॉडीच्या नवीन अहवालात करण्यात आली आहे.
सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, AQIS आता विखुरलेल्या गटातून एक प्रादेशिक दहशतवादी घटका म्हणून विकसित होत असून, त्यांनी आर्थिक आणि लॉजिस्टिक जाळे तयार केले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या स्फोटात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते. आयएसआयएस (ISIL) आणि अल-कायदाशी संबंधित संयुक्त राष्ट्राच्या १२६७ निर्बंध समितीकडे सादर करण्यात आलेल्या ३८ व्या अहवालात या हल्ल्याची अधिकृतपणे AQIS कडे जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे कि, अल-कायदा आणि आयएसआयएस अनेक वर्षांपासून रासायनिक व जैविक शस्त्रे विकसित करण्यात स्वारस्य दाखवत आहेत, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्यांना यश आले नाही. दरम्यान, भारताने दक्षिण आशियातील सुरक्षा आव्हानांवर आणि दहशतवादी गटांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले आहे.