भक्ती चाळक
ही घटना साधरण सात-आठ महिन्यांपूर्वीची. मुसळधार पावसात छतावरून पाण्याचे भलेमोठे थेंब कोसळत होते. त्या झोपडीत ८२ वर्षांच्या वत्सला खोत आणि ११० वर्षांची त्यांची आई थरथरत बसलेली होती. त्या काळरात्री निसर्गाच्या कोपाने त्यांची ती झोपडी भुईसपाट केली. त्या मायलेकीची ही परिस्थिती पाहून गावातील मुस्तकीम फारुक नदाफ त्या रात्री अस्वस्थ होता.
सकाळी उठल्याबरोबर मुस्तकीमने स्वतःचे कष्टाचे पैसे आणि मित्रांच्या मदतीने अवघ्या काही दिवसांत त्या दोन वृद्ध महिलांच्या डोक्यावर पक्क्या पत्र्याचे शेड उभे केले. फॅन, गॅस शेगडी आणि वर्षभराचे रेशन देऊन त्यांचे घर पुन्हा उभे केले. या पहिल्या घटनेने सांगलीच्या अष्टा येथील मुस्तकीमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली.
आपल्या या पहिल्या मदतीच्या आठवणींबद्दल बोलताना मुस्तकीम सांगतो, “त्या माय-लेकींना मदत केल्यावर त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद... बस, तिथूनच समाजकार्याच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला. एक पाऊल पुढे टाकले की रस्ता आपोआप सापडत जातो.”
५० टक्के कमाईचा दानधर्म
मुस्तकीमचा व्यवसाय पिढीजात आहे. १९७२मध्ये त्याच्या आजोबांनी सुरू केलेला ‘भारत गादी कारखाना’ आज मुस्तकीम पुढे चालवत आहे. वडिलांच्या काळातील पारंपरिक कापसाच्या गाद्यांच्या व्यवसायात त्याने काळानुसार बदल केले. आज तो सोफा, फॅन्सी कर्टन्स आणि मॉडर्न मॅट्रेसेस बनवतो.
पण या व्यवसायाचे एक खास वैशिष्ट्य आहे. मुस्तकीम आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या एकूण नफ्यातील तब्बल ५० टक्के हिस्सा या गरजू लोकांच्या सेवेसाठी वापरतो. याविषयी तो म्हणतो, “आमचा गादी-सोफ्याचा पिढीजात धंदा आहे. ईश्वराने न मागताच भरपूर काही दिले त्यामुळे माझ्या व्यवसायातील ५० टक्के रक्कम मी रोजच्या समाजकार्यासाठी बाजूला काढून ठेवतो.”
एक दिवसाची मुलगी घेतली दत्तक
मुस्तकीमच्या वैयक्तिक आयुष्यात अचानक मोठी उलथापालथ झाली. पत्नीपासून वेगळे होण्याच्या निर्णयानंतर त्याने खचून न जाता आपल्या दोन मुलांच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
मुस्तकीमला आधीच एक मुलगा होता. परंतु बहिणीला सलग चौथी मुलगी झाल्याने मुस्तकीमने संवेदनशील निर्णय घेतला. ती मुलगी अवघ्या एक दिवसाची असताना त्याने तिला दत्तक घेतले आणि स्वतःच्या लेकीप्रमाणे तिचा सांभाळ सुरू केला.
आपल्या या निर्णयावर मुस्तकीम म्हणतो, “मी क्षणाचाही विचार न करता मुलीला दत्तक घेतले. मी तिचे पालकत्व स्वीकारले.. ती एक दिवसाची असताना माझ्याकडे आलीये आणि आता मीच तिचा सांभाळ करतो.”
गोरगरिबांच्या ‘मदतीचा कंटेंट’
आजकाल तरुण मंडळी सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रील्स बनवतात. मुस्तकीमनेही सोशल मीडियाचा वापर केला, पण त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता.
एका दिवशी रस्त्याने जात असताना त्याच्या लहान मुलाने एका अपंग व्यक्तीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या प्रसंगाने मुस्तकीमच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण एकट्याने मदत करण्यापेक्षा जर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवला, तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि लोकांच्या मदतीतून हजारो गरिबांचे भले होऊ शकते, हा विचार त्याला आला.
सोशल मीडियाच्या या प्रवासाविषयी बोलताना मुस्तकीम सांगतो, “व्हिडिओ बनवून फक्त गरिबांची परिस्थिती दाखवण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा त्याच सोशल मीडियाचा वापर करून पैसे कमवायचे आणि तेच पैसे पुन्हा या गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी वापरायचे, हाच माझा खरा प्लॅन होता.”
दर महिन्याच्या तारखेला रेशन हजर!
मुस्तकीमचे समाजकार्य हे एखाद्या सण-उत्सवापुरते मर्यादित नाही. त्याने आपल्या गावातील आणि परिसरातील निराधार, अपंग आणि अत्यंत गरीब कुटुंबांची यादी तयार केली आहे. प्रत्येक महिन्याच्या ठरलेल्या तारखेला तो स्वतः त्यांच्या घरी जाऊन महिनाभराचे रेशन, गॅस सिलेंडर आणि इतर मूलभूत गरजा पुरवतो.
कुणाला व्हीलचेअर हवी असेल, कुणाला ट्रायसायकल हवी असेल किंवा कुणाच्या घराची दुरुस्ती करायची असेल, मुस्तकीम तिथे हजर असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मदत करताना तो समोरच्याचा धर्म किंवा जात कधीच पाहत नाही.
आपल्या या कामाच्या पद्धतीबद्दल सांगताना तो म्हणतो, “मी आधी स्वतः जाऊन सर्व्हे करतो की खरंच त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे का. मग महिना ते महिना तारीख लिहून ठेवलेली असते. त्या तारखेला रेशन, गॅस किंवा जे काही हवे असेल ते मी स्वतः पोहोचवतो.”
“गरिबी अन् आजाराला कोणताही धर्म नसतो…”
आपल्या समाजात सध्या धर्म आणि जातीवरून होणारे राजकारण पाहून मुस्तकीमला दुःख होते. त्याच्या मते, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला धर्माचा टॅग लावला जातो. पण निसर्गाच्या दरबारात सगळे एकच आहेत.
माणुसकीच्या या एकमेव धर्मावर निष्ठा ठेवून काम करणारा मुस्तकीम अतिशय सोप्या शब्दांत सांगतो, “गरिबी किंवा आजारपण कधीच हिंदू-मुस्लिम बघून येत नाही. मी मुस्लिम घरात जन्माला आलो म्हणून मुस्लिम झालो, तुम्ही हिंदूच्या घरात जन्माला आलात म्हणून हिंदू झालात. पण सर्वात मोठा धर्म माणुसकी हाच आहे. आपल्या गल्लीतील एका जरी गरिबाला सांभाळले तरी रस्त्यावर भीक मागणारे कोणी दिसणार नाही.”
जग बदलण्यासाठी मोठ्या बजेटची किंवा पदाची गरज नसते, हे मुस्तकीमने आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे. समाज घडवायला गरज असते ती फक्त एका संवेदनशील मनाची आणि मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांची.