मुहम्मद ओवैस, मीरा रोड,मुंबई:
मुंबई आणि उपनगरांतील गणेशोत्सव म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा! बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अवघी मुंबई जणू एका वेगळ्याच भक्तीरसात आणि उत्साहात बुडालेली असते. अनंत चतुर्दशी आणि इतर विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर भक्तांचा अथांग सागर उसळलेला असतो. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात चालणारी ही पावले अनेकदा कडक उन्हाने आणि दमछाकीने थकून जातात. अशावेळी या गर्दीत महाराष्ट्राला 'गंगा-जमनी' तेहजीबचं उदाहरण बघायला मिळालं.
मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड येथील पूनम सागर परिसरातील 'मास्टर बेकरी'चे मालक हसन खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विसर्जनाच्या मिरवणुकीत जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांसाठी खास मोफत सरबताचे स्टॉल लावून सर्वांची मने जिंकली आहेत.
लोकमान्य टिळकांचा विचार आणि आजचे वास्तव
१८९३ मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश केवळ धार्मिक नव्हता. समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे, हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. दुर्दैवाने, आजच्या काळात अनेकदा राजकीय स्वार्थासाठी या उत्सवाचा वापर समाजात दुही माजवण्यासाठी होताना दिसतो. मीरा रोडसारखा परिसर, जो काही काळापूर्वी वेगळ्याच जातीय तणावामुळे आणि वादांमुळे राज्यभर चर्चेत आला होता, त्याच मीरा रोडमधून जेव्हा सलोख्याचे आणि प्रेमाचे हे चित्र समोर येते, तेव्हा त्याचे महत्त्व कैकपटीने वाढते. हसन खान यांच्यासारखी माणसे खऱ्या अर्थाने आज टिळकांचा तो मूळ उद्देश जिवंत ठेवत आहेत.
कडक उन्हात भक्तांना दिलासा: ३, ७, ९ आणि ११ व्या दिवशीही स्टॉल
हसन खान हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या दिवशी हा उपक्रम न चुकता राबवत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, "आम्ही ज्या भागात राहतो, तिथे सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त कडक उन्हात, प्रचंड गर्दीत आणि तासनतास पायी चालत जातात. या थकलेल्या भक्तांना थोडा दिलासा मिळावा, त्यांचा थकवा दूर व्हावा, या एकाच विचाराने आम्ही सर्वांनी मिळून सरबत वाटप करण्याचे नियोजन केले आणि आम्ही हे दरवर्षी करतो."
या परिसरातील स्थानिक रहिवासी असलेले गणेशभक्त पांडे यांनी सांगितले की, "हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसतो. विसर्जनाच्या सर्व प्रमुख दिवशी म्हणजेच तिसऱ्या, सातव्या, नवव्या आणि अकराव्या दिवशी हे सरबताचे स्टॉल आवर्जून लावले जातात. शेकडो गणेशभक्त या थंडगार सरबताचा आनंद घेतात आणि खान साहेबांना मनापासून दुवा देतात."
केवळ सरबत नाही, तर गणेश मंडळांना 'वर्गणी' सुद्धा!
हसन खान यांचा या गणेशोत्सवातील सहभाग केवळ सरबत वाटपापुरता मर्यादित नाही. 'मास्टर बेकरी'तर्फे परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दरवर्षी वर्गणी देखील दिली जाते.
सध्याच्या सामाजिक वातावरणावर बोट ठेवताना खान पोटतिडकीने सांगतात, "आजकाल सगळीकडे एक वेगळेच वातावरण तयार केले जात आहे. नफरत आणि एकमेकांच्या धर्माविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. अशा वेळी ही द्वेषाची दरी कमी करण्यासाठी आणि प्रेमाचा पैगाम देण्यासाठी अशी पावले उचलणे खूप गरजेचे आहे. आम्ही केवळ गणेशोत्सवच नाही, तर होळी, दिवाळी, ईद आणि रमजान हे सर्वच सण परिसरातील नागरिकांसोबत एकत्र मिळून साजरे करतो."
प्रेमाची परतफेड प्रेमानेच: व्यवसायातही दुप्पट प्रगती
माणुसकीच्या या निखळ प्रेमाचा सकारात्मक परिणाम खान यांच्या व्यवसायावरही पाहायला मिळत आहे. समाजाकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खान अभिमानाने सांगतात, "आमच्या या वागणुकीमुळे लोक आमचा खूप आदर करतात. समाजात प्रेम आणि भाईचारा तर वाढतोच आहे, पण त्याचबरोबर लोकांच्या आशीर्वादामुळे माझ्या व्यवसायातही दुप्पट प्रगती होत आहे. लोकांच्या याच प्रेमामुळे गणेशोत्सवाच्या काळात आम्हाला खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या नेहमीपेक्षा खूप जास्त ऑर्डर्स मिळाल्या."
हेही वाचा: मस्जिदी केवळ नमाजचे स्थान नसून मानवतेची सेवा करण्याचे केंद्र
या उपक्रमावर प्रतिक्रिया देताना एका गणेशभक्ताने अतिशय मार्मिक मत मांडले, "हिंदू असो वा मुस्लीम, शीख असो वा ख्रिश्चन, अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक समाजाने राबवले पाहिजेत. समाजात दुही माजवू पाहणाऱ्यांना आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना अशा कृतींतूनच योग्य ते उत्तर देता येईल. लोकांच्या मनातील वाढलेली दुरावाची भावना कमी करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने अशाच 'सरबताच्या गोडव्याची' गरज आहे!"
मीरा रोडमधील हा प्रसंग आपल्याला पुन्हा एकदा हेच सांगून जातो की, कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही.