मुंबई
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात (CEC) २ ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, पालिकेची परवानगी नसणे आणि वाहतूक कोंडीची शक्यता या कारणांचा हवाला देत कॉकरोच जनता पार्टीचा (CJP) अर्ज फेटाळण्यात आला आहे.
अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील या संघटनेच्या वतीने २६ पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला होता. मात्र, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पोलीस विभागाला या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी देण्याचे अधिकार नाहीत.
शिवाजी पार्क हे रहिवासी परिसराशेजारील एक घोषित शांतता क्षेत्र (Silence Zone) असल्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच या प्रस्तावित आंदोलनामुळे तीव्र वाहतूक कोंडी होऊन परिसरातील प्रमुख रुग्णालयांकडे जाणाऱ्या आपत्कालीन वाहनांच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या आंदोलनासाठी मुंबईत अन्य योग्य पर्यायी ठिकाणांचा शोध घ्यावा, अशी सल्लावजा सूचना आयोजकांना देण्यात आली आहे. दरम्यान, मतदारयाद्यांच्या विशेष फेरतपासणीतील (SIR) कथित अनियमिततेविरोधात निवडणूक आयोगाविरोधात देशभरात आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे CJP कडून यापूर्वी घोषित करण्यात आले होते.