Pune Digital Arrest Scam: ८२ वर्षीय वृद्धाची फसवणूक करणाऱ्या 'रील-स्टार' रोहन जाधवसह पाच जण जेरबंद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 11 h ago
हाँगकाँगच्या हँडलर्सशी होता थेट संबंध; पुण्यातील बहुचर्चित डिजिटल अरेस्ट प्रकरणी मोठी कारवाई
हाँगकाँगच्या हँडलर्सशी होता थेट संबंध; पुण्यातील बहुचर्चित डिजिटल अरेस्ट प्रकरणी मोठी कारवाई

 

पुणे 

पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. रोहन जाधव (२६, रा. पिंपळे निलख, पुणे) असे या युट्यूब-इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या 'रील-स्टार'चे नाव असून, या प्रकरणात यापूर्वी चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांनी वृद्ध नागरिकाच्या नावाचा वापर करून कॅनरा बँकेत बनावट खाते उघडले होते. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून, 'जेट एअरवेज'चे संस्थापक नरेश गोयल प्रकरणाशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांत हे खाते वापरले असून तुम्हाला व कुटुंबाला अटक केली जाईल, अशी धमकी भामट्यांनी दिली. पैशांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली वृद्धाला भीती घालून त्याच्याकडून तब्बल १०.७४ कोटी रुपये विविध खात्यांवर वर्ग करून घेण्यात आले.

हाँगकाँगच्या हँडलर्सशी संबंध आणि तपास

तपासामध्ये हे पैसे ५ हजार ४३६ वेगवेगळ्या बँक खात्यांवर वळवण्यात आल्याचे उघड झाले. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यापूर्वी चार जणांना अटक केली होती. छत्रपती संभाजीनगरचा मूळ रहिवासी असलेला आणि विज्ञान शाखेत पदवी घेतलेला रोहन जाधव हा मुख्य आरोपींचा साथीदार असून तो हाँगकाँग येथील संशयित आंतरराष्ट्रीय हँडलर्सच्या संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या बँक व्यवहारांची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातून पोलिसांनी १.३४ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे.