आज स्वातंत्र्यदिनी आठवूयात राष्ट्रध्वज बनवणाऱ्या मुस्लिम कुटुंबाचा सुवर्णइतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 10 h ago
दिल्लीच्या सदर बाजारमध्ये अब्दुल मलिक यांचे कुटुंब राष्ट्रध्वज तयार करताना
दिल्लीच्या सदर बाजारमध्ये अब्दुल मलिक यांचे कुटुंब राष्ट्रध्वज तयार करताना

 

ओनिका माहेश्वरी

स्वातंत्र्यदिन जवळ आला की संपूर्ण देशात तिरंग्याची मागणी अचानक वाढू लागते. बाजारपेठा सजतात, शाळांमध्ये तयारीला उधाण येते, सरकारी अन् खाजगी कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज पोहोचू लागतात आणि 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. पण जेव्हा देशभरात लाखो नागरिक अभिमानाने तिरंगा हातात धरतात, तेव्हा हा राष्ट्रध्वज तयार करणाऱ्या अदृश्य हातांकडे आपले लक्ष जाते का?

दिल्लीतील सदर बाजाराच्या एका जुन्या गल्लीत असेच एक कुटुंब राहते. त्यांच्यासाठी तिरंगा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नसून अनेक दशकांपासून चालत आलेली एक मोठी जबाबदारी, सन्मान आणि वारसा आहे. याच कुटुंबाने 'फ्लैग अंकल' नावाने प्रसिद्ध असलेल्या अब्दुल गफ्फार यांची ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे भाऊ अब्दुल मलिक हाच वारसा पुढे नेला.

१९६२ च्या भारत-चीन युद्धापासून सुरू झालेला प्रवास
या कुटुंबाची तिरंगा बनवण्याची कथा कोणत्याही व्यावसायिक योजनेतून नाही, तर देशाच्या अत्यंत कठीण काळातून सुरू झाली होती. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा देशभरात राष्ट्रभक्तीची प्रचंड लाट उसळली आणि राष्ट्रध्वजांची गरज झपाट्याने वाढली.

त्याच काळात या कुटुंबाने तिरंगा बनवण्याचे काम हाती घेतले. त्या कठीण प्रसंगी देशाची गरज भागवण्यासाठी सुरू झालेले हे काम हळूहळू या कुटुंबाची ओळख बनले. काळ बदलला, पण तिरंग्याशी असलेले त्यांचे नाते कधीच तुटले नाही. आज कुटुंबाची तिसरी पिढी हाच परंपरा जपण्याचे काम करत आहे.

'फ्लैग अंकल' नावाची मिसाल
सदर बाजारात अब्दुल गफ्फार यांना सगळे लोक प्रेमाने 'फ्लैग अंकल' म्हणून हाका मारायचे. अनेक वर्षे त्यांनी स्वतःच्या हातांनी तिरंगे तयार केले अन् देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यांचे नाव केवळ बाजारापुरते मर्यादित राहिले नाही, तर राष्ट्रध्वज बनवणारा एक अत्यंत विश्वासू चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

अब्दुल गफ्फार यांच्या निधनानंतर ही जबाबदारी त्यांचे धाकटे भाऊ अब्दुल मलिक यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यही तितक्याच निष्ठेने या कामात गुंतलेले असतात. त्यांचे भाऊ, जावई आणि संपूर्ण कुटुंब आजही त्याच समर्पणाने तिरंगे बनवत आहे.

१५ ऑगस्टआधी सदर बाजाराचे बदलते रूप
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवसांत या कुटुंबाची सर्वात जास्त धावपळ असते. १५ ऑगस्ट जवळ आला की सदर बाजारातील या वर्कशॉपमध्ये रात्रंदिवस काम चालते.

तिथे पाऊल ठेवताच एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. कुठे केशर रंगाच्या कापडाची कटिंग चाललेली असते, तर कुठे पांढऱ्या अन् हिरव्या कापडाला ठरलेल्या प्रमाणात कापले जात असते. दुसऱ्या बाजूला शिलाई मशीनचा आवाज अविरत सुरू असतो आणि काही जण तयार झालेले झेंडे घडी घालून पॅकिंग करण्यात व्यग्र असतात. वर्कशॉपमधील संपूर्ण वातावरण तिरंग्याच्या तीन रंगांत न्हाऊन निघते. इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाची जबाबदारी ठरलेली असते आणि १५ ऑगस्टआधी कामाचा वेग दुप्पट-तिप्पट होतो.

कसा तयार होतो तिरंगा?
वरवर पाहता तिरंगा शिवणे हे साधे शिलाईचे काम वाटू शकते, पण यात प्रचंड अचूकता अन् बारकावे जपावे लागतात. संपूर्ण प्रक्रिया कापडाच्या कटिंगपासून सुरू होते. सर्वप्रथम केशरी, पांढरा आणि हिरवा कापड भारतीय राष्ट्रध्वजाच्या नियमानुसार योग्य प्रमाणात कापला जातो. यानंतर तिन्ही रंगांना अतिशय काळजीपूर्वक एकत्र जोडले जाते.

शिलाई करताना प्रत्येक पट्टीचे माप अगदी तंतोतंत राहील याची दक्षता घेतली जाते. शेवटच्या टप्प्यात पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी अशोक चक्र छापले किंवा जोडले जाते. यानंतर ध्वजाच्या गुणवत्तेची कडक तपासणी होते आणि मगच पॅकिंग केले जाते. प्रत्येक तिरंग्यामागे कारागिरांची मेहनत, संयम अन् प्रचंड बारकाईने केलेले काम दडलेले असते.

'हर घर तिरंगा' मोहिमेत एकाच दिवशी १.५ लाख झेंडे!
आपल्या आठवणी सांगताना अब्दुल मलिक म्हणतात, "आमच्या कुटुंबाने अनेक मोठ्या ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत, पण 'हर घर तिरंगा' मोहिमेचा काळ आमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा होता. त्या काळात आम्हाला राष्ट्रध्वज बनवण्याची खूप मोठी ऑर्डर मिळाली होती. मागणी इतकी प्रचंड होती की आमच्या संपूर्ण कुटुंबाला दिवस-रात्र एक करून काम करावे लागले. त्या काळात आम्ही एकाच दिवसात दीड लाखांपेक्षा जास्त तिरंगे तयार केले होते."

हा आकडाच सांगून जातो की राष्ट्रीय सणांच्या काळात या कुटुंबाच्या कामाची व्याप्ती किती मोठ्या प्रमाणावर वाढते. देशातच नाही, तर सातासमुद्रापार पोहोचतात हे तिरंग आपल्या कामाचा विस्तार सांगताना अब्दुल मलिक पुढे म्हणतात, "आमच्याकडे तयार होणारे तिरंगे फक्त दिल्ली किंवा आसपासच्या परिसरापुरते मर्यादित राहत नाहीत. देशातील विविध राज्यांमध्ये आमचा माल पुरवला जातो आणि अनेक तिरंगे परदेशातही पाठवले जातात. याच कारणामुळे सदर बाजारातील आमची ही छोटीशी कार्यशाळा आज राष्ट्रध्वज निर्मितीचे एक मुख्य केंद्र बनली आहे."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaj Tak (@aajtak)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुकाची थाप 
अब्दुल मलिक यांच्याकडे एक खूप रंजक आठवण आहे. ते सांगतात, "एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आम्हाला असा एक प्रचंड मोठा झेंडा तयार करायला सांगितला, जो याआधी कधीच कोणी बनवला नसेल. त्यानंतर आमच्या कुटुंबाने ६०×९० फुटांचा एक भव्य आणि ऐतिहासिक राष्ट्रध्वज तयार केला. या झेंड्याची एक खास गोष्ट पाकिस्तानशीसुद्धा जोडलेली होती. आमच्या आयुष्यातील हा एक अत्यंत अभिमानास्पद अनुभव होता."

कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये फडकणारा भव्य तिरंगा
दिल्लीच्या कनॉट प्लेस (सीपी) येथील सेंट्रल पार्कमध्ये फडकणारा विशाल राष्ट्रध्वज आज देशाची राजधानी दिल्लीची मुख्य ओळख बनला आहे. हा भव्य झेंडासुद्धा आपल्याच कुटुंबाने तयार केल्याचे अब्दुल मलिक अत्यंत अभिमानाने सांगतात. देशाच्या मध्यवर्ती भागात जो राष्ट्रध्वज डौलाने फडकतोय, तो आपल्या हातातून बनलाय ही भावनाच त्यांच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या आधी इथे तयार झालेले तिरंगे देशाच्या कानाकोपऱ्यात रवाना होतात. हे राष्ट्रध्वज मुख्य बाजारपेठांमध्ये पोहोचतात, शाळा-कॉलेजच्या मैदानावर फडकतात, सरकारी अन् खाजगी संस्थांच्या इमारतींवर लावले जातात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरांत राष्ट्रीय उत्सवाचा भाग बनतात. जेव्हा संपूर्ण देशात लाखो लोक हातात तिरंगा घेऊन उभे राहतात, तेव्हा त्यामागे अशाच निष्ठावान कारागिरांची मेहनत दडलेली असते.

तिसरी पिढी जपतेय राष्ट्रप्रेमाचा वारसा
आज हे काम फक्त अब्दुल मलिक यांच्यापुरते राहिलेले नाही. त्यांच्यासोबत त्यांचे जावई, भाऊ आणि घरातील नवी तरुण पिढी या कामात पूर्णपणे उतरली आहे. कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की हा वारसा अब तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे आणि येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत ही परंपरा अशीच अखंड सुरू राहील. त्यांच्यासाठी तिरंगा शिवणे हा केवळ रोजगाराचा मार्ग नसून ती एक भावूक देशभक्तीची जबाबदारी आहे.

प्रत्येक तिरंग्यात वसते एक वेगळी गोष्ट!
जेव्हा एखादी व्यक्ती बाजारातून तिरंगा विकत घेते, तेव्हा ती तिच्यासाठी काही मिनिटांची खरेदी असू शकते. पण त्या एका तिरंग्यामागे कित्येक तासांची मेहनत, वर्षांचा अनुभव आणि तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा जोडलेला असतो. सदर बाजारातील त्या वर्कशॉपमध्ये कापडाचे तीन रंग येतात, त्यांची अचूक कटिंग होते, शिलाई होते, अशोक चक्र बसवले जाते, गुणवत्तेची तपासणी होते, पॅकिंग होते अन् मग तेच तिरंगे देशभरात रवाना होतात.

१५ ऑगस्टच्या सकाळी जेव्हा संपूर्ण देशात तिरंगा डौलाने फडकतो, तेव्हा त्यामागे व्यासपीठावर नाव न येणाऱ्या अशाच अनेक अदृश्य हातांचे कष्ट असतात. दिल्लीकरांनी ज्यांना प्रेमाने 'फ्लैग अंकल' म्हटले, ते अब्दुल गफ्फार आज आपल्यात नाहीत. पण त्यांची ही राष्ट्रप्रेमाची परंपरा आज प्रत्येक शिलाईत आणि प्रत्येक तिरंग्यात जिवंत आहे!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter