भारताची सहनशीलता म्हणजे कमकुवतपणा नव्हे : NSA अजित डोवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

 

भारताचे औदार्य आणि सहनशीलता म्हणजे आमचा कमकुवतपणा नव्हे, असा कडक इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला आहे. परिणामांची कसलीही पर्वा न करता भारत मोठे धोके पत्करू शकतो आणि शत्रूवर थेट प्रहार करू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

डिस्कव्हरी वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'डिक्लासिफाईड: ऑपरेशन सिंदूर' या विशेष डॉक्युसीरिजमध्ये अजित डोवाल यांनी हे मोठे विधान केले आहे. तब्बल ८८ तास चाललेल्या या ऐतिहासिक लष्करी कारवाईचा मुख्य उद्देश शत्रूचे तळ उद्ध्वस्त करणे हाच होता, विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जे जबाबदार होते त्यांचा खात्मा करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगाला आम्ही स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो
ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर दिलेल्या आपल्या पहिल्याच मुलाखतीत अजित डोवाल म्हणाले की, आम्ही या मोहिमेचे उद्दिष्ट अगदी निश्चित केले होते. शत्रूचे तळ नष्ट करणे आणि विशेषतः ज्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला होता त्यांना धडा शिकवणे हाच आमचा हेतू होता.

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही संपूर्ण जगाला स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो, भारताचे औदार्य किंवा भारताची सहनशीलता म्हणजे आमचा कमकुवतपणा, असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. परिणामांची अजिबात चिंता न करता भारत मोठे निर्णय घेऊ शकतो, धाडस दाखवू शकतो आणि शत्रूवर अत्यंत तीव्र प्रहार करू शकतो.

डॉक्युसीरिजमधून समोर येणार रणनीती
डिस्कव्हरीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ही दोन भागांची विशेष मालिका भारताच्या लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा नेतृत्वाला एकाच मंचावर आणणार आहे. भारताच्या या धडक कारवाईचे प्रत्यक्ष नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि तज्ज्ञांच्या थेट अनुभवातून ऑपरेशन सिंदूर दरम्यान घडलेल्या घडामोडी आणि घेतलेले ऐतिहासिक निर्णय समोर आणले जातील.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारताच्या लष्करी कारवाईमागील कठोर निर्णयप्रक्रिया आणि दृढ संकल्पाची सविस्तर माहिती दिली आहे. ही विशेष मालिका शनिवारी रात्री ९:०० वाजता डिस्कव्हरी चॅनेलवर आणि डिस्कव्हरी प्लस या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाणार आहे.

८८ तासांचा संघर्ष आणि अचूक हल्ले
गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पहाटे ऑपरेशन सिंदूर ही धडक लष्करी मोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर अचूक हल्ले चढवले होते.

भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावत ऑपरेशन सिंदूर अंतर्गतच आक्रमक प्रत्युत्तर दिले. अण्वस्त्रसज्ज असलेल्या या दोन शेजारील देशांमधील हा लष्करी संघर्ष तब्बल ८८ तास चालला. अखेर १० मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये सामंजस्य झाल्यानंतर हा संघर्ष थांबवण्यात आला होता.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter