कारंजा लाडच्या गणेश विसर्जनात मुस्लीम बांधवांच्या सौहार्दपूर्ण कृतीचं होतंय कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
इमाम साहेब हाफिज सय्यद अहमद यांनी स्वतः पुढे येत गणेश भक्तांची भेट घेतली
इमाम साहेब हाफिज सय्यद अहमद यांनी स्वतः पुढे येत गणेश भक्तांची भेट घेतली

 

आतिफ अहमद / कारंजा (वाशिम)

संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहराने हिंदू-मुस्लीम भाईचाऱ्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक अद्वितीय आदर्श पुन्हा एकदा संपूर्ण देशासमोर ठेवला आहे. आपल्या मिश्र संस्कृतीचे ते एक ज्वलंत उदाहरण आहे. 

एक प्रदीर्घ आणि वैभवशाली परंपरा

कारंजा शहराला सामाजिक सलोख्याची अतिशय सुंदर आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. दरवर्षी नगीना मस्जिदीसमोरून जाणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाचे स्थानिक मुस्लीम नेते आणि खुद्द मस्जिदीचे इमाम साहेब अत्यंत आत्मीयतेने आणि उत्साहात स्वागत करतात. भूतकाळात याच ठिकाणी मुस्लीम बांधवांकडून गणेशभक्तांवर पुष्पवृष्टी करण्याची वैभवशाली परंपराही या शहराने अनुभवली आहे आणि तोच एकतेचा आणि प्रेमाचा वारसा आजही तितक्याच निष्ठेने आणि अखंडपणे जपला जात आहे.

इमाम साहेबांकडून बाप्पाला निरोप आणि शुभेच्छा

गुरुवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या गणेश विसर्जनाच्या पवित्र दिवशी नगीना मस्जिदीचे इमाम साहेब हाफिज सय्यद अहमद यांनी स्वतः पुढाकार घेतला. ते पुढे येत गणेशभक्तांना भेटले, त्यांना सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि समाजात हिंदू-मुस्लीम बंधुत्वाचा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत विसर्जनासाठी निघालेल्या भक्तांचा आनंद या स्वागतामुळे द्विगुणित झाला होता.

पोलीस प्रशासनाचा आणि पत्रकाराचा विशेष सन्मान

सलोख्याच्या या मंगलमय वातावरणात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मुस्लीम समाजसेवकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने अप्पर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे साहेब आणि ठाणेदार अमर चोरे साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

या उदात्त आणि स्तुत्य कार्यासाठी कारंजेचे ज्येष्ठ माजी उपाध्यक्ष बिस्मिल्लाह ऊर्फ बिसू पहेलवान आणि त्यांचे सहकारी जहीर भाई, हे दरवर्षीप्रमाणे यंदाही नगीना मशिदीजवळ आवर्जून उपस्थित होते. याच सोहळ्यादरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रकारितेचा पुरस्कार पटकावणारे कारंजाचे युवा पत्रकार सलीम खान यांचा पोलीस विभागाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राझिक भाई, पत्रकार महेंद्र गुप्ता, दिलीप रोकडे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते अझहर अहमद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

एमआयएम (MIM) नगर परिषदेचा पुढाकार आणि सोयी-सुविधा

यंदाच्या विसर्जन सोहळ्याचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नगर परिषदेने घेतलेला पुढाकार. कारंजा नगर परिषदेत मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM) ची सत्ता असून, त्यांच्या वतीने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती. नगर परिषदेचे शिक्षण सभापती तथा एमआयएमचे विद्यमान नगरसेवक झाकीर शेख यांनी स्वतः संपूर्ण शहरात फिरून विसर्जन मिरवणुकांतील गणेश मंडळांचे स्वागत केले व सोयी-सुविधांची जातीने पाहणी केली. नगीना मस्जिदीसमोरही इमाम साहेबांसोबत झाकीर शेख व इतर अनेक मुस्लीम नगरसेवक उपस्थित राहून या राष्ट्रीय उत्सवाची शोभा वाढवत होते.

हेही वाचा: मुस्लीम चित्रकारांच्या कुंचल्यातून साकारलेले बाप्पा

हाजी मोहम्मद युसूफ सेठ पुंजानी यांची उपस्थिती

या सर्व मंगलमय वातावरणात आणखी भर घातली ती कारंजातील नेते हाजी मोहम्मद युसूफ सेठ पुंजानी यांच्या उपस्थितीने. एमआयएमचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष असलेले पुंजानी यांनी नगीना मस्जिदीजवळ आवर्जून उपस्थित राहून पोलीस अधिकारी व प्रशासनाशी सौहार्दपूर्ण चर्चा केली व सर्वांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. कारंजा शहरातील मुस्लीम बांधवांनी दाखवलेला हा सर्वधर्मसमभावाचा प्रत्यय संपूर्ण देशासाठी दिशादर्शक आणि अभिमानास्पद ठरला आहे.