INDIA DEFENCE: भारताची संरक्षण क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती; निर्यातीचा टप्पा ३८ हजार कोटींपार, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
राजनाथ सिंह
राजनाथ सिंह

 

नवी दिल्ली

भारत आता केवळ तंत्रज्ञान आयात करणारा देश न राहता ते स्वतः परिभाषित करणारा देश बनत असून, देशात सहाव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या निर्मितीवर काम सुरू आहे, अशी महत्त्वाची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. नवी दिल्ली येथील एका संरक्षण परिषदेत बोलताना त्यांनी भारताच्या आगामी काळातील सुरक्षा धोरणांवर आणि संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेवर प्रकाश टाकला.

दहशतवादाविरोधात भारताची कडक भूमिका

शेजारी देशाने राज्य धोरण म्हणून दहशतवादाला पाठिंबा देणे सुरू ठेवल्यास, भारताला कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला. भारत शांततेवर विश्वास ठेवत असला तरी ती कमकुवतपणा समजली जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. एससीओ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यांनी दहशतवाद हा कोणासाठीही धोरणात्मक संपत्ती असू शकत नाही, असे सुनावले.

संरक्षण निर्यातीत विक्रमी वाढ

गेल्या दशकात संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताची संरक्षण निर्यात २०१३-१४ मधील ६८६ कोटी रुपयांवरून २०२५-२६ मध्ये विक्रमी ३८,४२४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सध्या १०० हून अधिक देशांमध्ये भारतीय उपकरणांची निर्यात होत असून, २०२९ पर्यंत ५० हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. भविष्यातील युद्धांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञानावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.