मस्जिदींमधून गुंजणार स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

अल्फिया शेख

दर शुक्रवारी म्हणजेच जुमाच्या दिवशी देशभरातील मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात. इतक्या मोठ्या संख्येने आणि शिस्तीने एकत्र येणाऱ्या मुस्लिम समाजाला एखाद्या विधायक, सकारात्मक अन् देशोपयोगी उपक्रमाकडे वळवणे या निमित्ताने अत्यंत सहज शक्य असते.

स्वातंत्र्यदिन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना, यंदा स्वातंत्र्यदिनाच्या अगदी पूर्वसंध्येलाच शुक्रवार आला. या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधत पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी एका अत्यंत अनोख्या अन् राष्ट्रप्रेमाने प्रेरित आवाहनाची सुरुवात केली आहे.

पूर्वजांच्या बलिदानाविषयी समाज अनभिज्ञ
या आवाहनाविषयी बोलताना अंजुम इनामदार यांनी 'आवाज द व्हॉईस'शी विशेष संवाद साधला. या उपक्रमामागची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ते म्हणाले, "आपण भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामापासून ते संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यापर्यंत भारतीय मुस्लिमांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिलेले आहे. परंतु दुर्दैवाने या ऐतिहासिक योगदानाविषयी बहुसंख्यांक हिंदू समाजाला तर माहिती नाहीच, पण खुद्द मुस्लिम समाजही यापासून अनभिज्ञ आहे. आजच्या काळात आपल्या पूर्वजांच्या या बलिदानाची अन् पराक्रमाची योग्य माहिती समाजाला असणे अत्यंत गरजेचे झाले आहे."

अस्वस्थतेतून जन्माला आलेले एक आवाहन
ऐतिहासिक माहितीच्या अभावामुळे अनेकदा मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर आणि देशभक्तीवर शंका उपस्थित केल्या जातात. त्यांच्यावर चुकीचे आरोप केले जातात. अशा वेळी आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान इतिहास अन् त्याग समोर ठेवून त्याला योग्य ते उत्तर देण्यात मुस्लिम समाज बऱ्याचदा कमी पडतो.

याच सामाजिक अस्वस्थतेतून काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे, हा विचार पुढे आला. हेच लक्षात घेऊन अंजुम इनामदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरातील सर्व मुस्लिम मौलवी, मस्जिदी आणि मदरसांच्या प्रमुखांना एक विशेष आवाहन केले.

धार्मिक व्यासपीठांची भूमिका
या आवाहनाविषयी सविस्तर बोलताना अंजुम इनामदार पुढे म्हणतात, "मदरसांमधील धार्मिक अभ्यासक्रमामध्ये 'मुसलमानों का आज़ादी-ए-वतन में योगदान' या विषयावर माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे मदरसांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मौलवीला आपल्या या पूर्वजांच्या त्यागाची पूर्ण जाणीव असते. मात्र अनेक सामाजिक दडपणांमुळे आणि इतर कारणांमुळे धार्मिक व्यासपीठांवरून किंवा जुमाच्या प्रवचनांमधून या विषयावर उघडपणे बोलणे अन् पूर्वजांचे कर्तृत्व अधोरेखित करणे टाळले जाते."

जुमाच्या प्रवचनातून देशप्रेमाची जनजागृती
धार्मिक विधी आणि प्रार्थनेसाठी का होईना, पण मस्जिदींमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, ही जनजागृतीसाठी फार मोठी संधी असते. हीच बाब ओळखून अंजुम इनामदार मौलवींना एक विशेष विनंती केली.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, जुमाच्या नमाझच्या आधी मौलवींकडून जे खुत्बा (प्रवचन) दिले जाते, त्यामध्ये भारतीय मुस्लिमांच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाला, त्यांच्या बलिदानाला अन् कुर्बानिना उजाळा देण्यात यावा, अशी हाक त्यांनी दिली.

व्हिडिओद्वारे मौलवी आणि धर्मगुरूंना साद
अंजुम इनामदार यांनी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे देशभरातील सर्व धर्मगुरू आणि मौलवींना नम्र आवाहन केले. जुमाच्या नमाझपूर्वी मिळणाऱ्या वेळेत मुस्लिम समाजाला आपल्या देशाच्या इतिहासाची, स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिम सैनिकांच्या अन् नेत्यांच्या योगदानाची माहिती द्यावी, जेणेकरून उपस्थितांमध्ये देशभक्तीची अन् आत्मभानाची नवी लहर निर्माण होईल.

या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी बोलताना अंजुम इनामदार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "मी गेली अनेक दशके सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे, मात्र आमच्या या आवाहनाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे तो अत्यंत आश्वासक आहे. देशभरातील विविध धर्मगुरू, मौलवी आणि मस्जिदींच्या विश्वस्तांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली."

ते पुढे म्हणाले की, "माझ्या आवाहनानंतर अनेक मस्जिदींमधून आजच्या जुमाच्या नमाझमध्ये या विषयावर बोलण्याचे आश्वासन देण्यात आले. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की, आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या जुमाच्या नमाझमध्ये अनेक मस्जिदींमधून स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लिमांच्या योगदानाला हिरिरीने उजाळा देण्यात आला."

वतनपरस्ती अन् इस्लामचा संदेश
या आवाहनामागचा मुख्य उद्देश स्पष्ट करताना अंजुम इनामदार यांनी इस्लाममधील संदेशाचा उल्लेख केला. ते म्हणाले, "'वतन से मोहब्बत' हा इस्लामचा अन् प्रेषितांच्या हदीसचा महत्त्वाचा संदेश आहे. इस्लाममध्ये वतनपरस्ती म्हणजेच देशभक्ती आणि वतन की खिदमत (देशाची सेवा) या गोष्टींचे पूर्ण समर्थन करण्यात आले आहे. प्रत्येक मुस्लिमाने आपल्या देशाप्रती निष्ठा अन् अभिमान बाळगला पाहिजे. देशाच्या वर्तमानाविषयी, भवितव्याविषयी आणि विकासाविषयी मुस्लिमांनी आग्रही भूमिका बजावून आपले योगदान दिले पाहिजे."

मिळालेल्या या अभूतपूर्व प्रतिसादाने प्रेरित होऊन ही मोहीम केवळ एका राज्यापुरती मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा संकल्प अंजुम यांनी केला आहे. इतर राज्यांत आणि देशाच्या कानाकोपऱ्यातही अशाच प्रकारे समाज पुढे येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यामुळे पूर्वजांच्या बलिदानाला उजाळा तर मिळेलच, पण भविष्यातही देशासाठी काहीतरी करण्याची भावना तरुण पिढीच्या मनात तीव्र होईल. अंतिमतः यातून समाजाचे, कुटुंबाचे आणि आपल्या महान भारताचे भले होईल, असा ठाम विश्वास अंजुम इनामदार यांनी शेवटी व्यक्त केला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter