अर्शिया परवीन : नाट्य दिग्दर्शनात ४० हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे बहुआयामी व्यक्तिमत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
अर्शिया परवीन
अर्शिया परवीन

 

फरहान इस्रायली

जयपूरच्या रामगंज बाजारातील अरुंद गल्ल्या... जुनाट सामाजिक विचार... अन् अठरा विश्वे दारिद्र्य. अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत एका मुलीने भारतीय रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून दिग्दर्शन, अभिनय, कॉस्च्युम डिझायनिंग, लाईटिंग अन् लेखन अशा नाटकाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलाय.

ही प्रेरणादायी कहाणी आहे अर्शिया परवीन यांची. जयपूरच्या ऐतिहासिक परकोट्यात राहणारे रझा हुसेन आणि रईसा बानो यांच्यापोटी जन्माला आलेल्या अर्शिया यांच्या नावाचा अर्थ 'आकाशाच्या शिखरावर राहणारी' असा होतो. पण त्यांचे सुरुवातीचे आयुष्य प्रचंड आर्थिक अडचणींनी भरलेले होते.

कौटुंबिक परिस्थितीमुळे १० वीत असतानाच त्यांना आईला मदत करण्यासाठी शिवणकाम आणि भरतकाम सुरू करावे लागले. गल्लीतील मुलींना सातवी-आठवीच्या पुढे शिकू न देणाऱ्या समाजात, निरक्षर आईच्या खंबीर पाठिंब्यामुळे अर्शिया यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
 

बुरखा उतरवण्याचा तो धाडसी निर्णय
२००८ मध्ये पदवी पूर्ण झाल्यावर त्यांनी जयपूरच्या एका खासगी शाळेत कॉम्प्युटर शिक्षिका म्हणून काम सुरू केले. जेव्हा त्या बुरखा घालून शाळेत जायच्या, तेव्हा आजूबाजूचे लोक टोमणे मारायचे. 'मुलीला घरी बसवा अन् शिवणकाम शिकवा' असा फुकटचा सल्ला त्यांच्या आईला दिला जायचा.

या टोमण्यांना कंटाळून अर्शिया यांनी बुरखा उतरवण्याचा कठीण निर्णय घेतला. लज्जा ही कपड्यांमध्ये नसून माणसाच्या नजरेत अन् विचारात असते, यावर त्यांचा विश्वास होता. या निर्णयामुळे समाज आणि नातेवाईकांचा विरोध झाला, पण आईचा शांत पाठिंबा कायम त्यांच्यासोबत राहिला.

रंगभूमीशी भेट अन् पाठीवरची थाप
२००९ मध्ये शाळेत काम करत असताना त्यांची भेट मराठी आणि हिंदी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यकर्मी हेमचंद्र (राजू) ताम्हाणकर यांच्याशी झाली. अर्शिया त्यांना आदराने दादा म्हणायच्या. राजू ताम्हाणकर यांनी इरफान खान अन् मिलिंद सोमण यांसारख्या कलाकारांसोबत काम केले होते.

दरम्यान, अर्शिया यांच्या आईला अर्धांगवायूचा झटका आला आणि घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर पडली. आईच्या निधनानंतर अर्शिया प्रचंड डिप्रेशनमध्ये गेल्या. या बिकट काळात दादांनी त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी नाटकाच्या विश्वात आणले.
 

शुरुवातीला अभिनयाला नकार देत त्यांनी बॅकस्टेज काम निवडले. २०१० मध्ये कॉस्च्युम डिझायनिंगपासून सुरुवात केली. २०११ मध्ये भारतांबा नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनरचा पुरस्कार मिळाला. हळूहळू त्यांनी संगीत अन् लाईटिंग डिझाईनवरही प्रभुत्व मिळवले.

मुख्य भूमिकेतून अभिनयाचा धमाका
२०१४ मध्ये आग्रा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत नाटकातील मुख्य अभिनेत्री ऐनवेळी येऊ शकली नाही. अर्शिया यांना मुख्य भूमिकेत उतरावे लागले आणि त्यांनी थेट राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला.

त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१५ मध्ये सिलीगुडी येथे डॉ. शंकर शेष लिखित रक्तबीज या प्रसिद्ध नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली. हे नाटक देशभरात २६ वेळा सादर झाले असून या नाटकाला १२ हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

त्याच वर्षी त्यांनी दादांनी लिहिलेल्या प्रहरी या नाटकाचे पहिल्यांदा दिग्दर्शन केले. भारत-पाकिस्तान सीमेवरील सैनिकांच्या मानसिक स्थितीवर आधारित या नाटकाला वेगवेगळ्या राज्यांत ४० हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून आतापर्यंत ३६ प्रयोग झाले आहेत.

एक रंजक योगायोग म्हणजे, २००९ मध्ये अर्शिया यांनी प्रेक्षक म्हणून पाहिलेल्या 'आंतरद्वंद्व' या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा २०१९ मध्ये त्यांच्याकडे आली. सरोगसीसारख्या गंभीर विषयावर आधारित हे नाटक आता मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये गाजते आहे.
 

समाजाचे टोमणे अन् यशाचे उत्तर
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तालमी अन् इतर शहरांत जाऊन प्रयोग करणे, यावर समाजात बरीच टीका झाली. सुरुवातीला स्वतःच्या जयपूर शहरात प्रयोग करताना त्या कचरायच्या. पण स्वतःच्या कामातून अन् ताकदीने त्यांनी विरोधकांची तोंडे बंद केली. आज कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय त्या ताम्हाणकर थिएटर अकादमीच्या माध्यमातून राजस्थानमध्ये व्यावसायिक नसलेले नाटक जिवंत ठेवत आहेत.

नाटकासोबतच त्यांनी राजस्थान पर्यटनासाठी बांसवाडा आणि डुंगरपूरच्या आदिवासी भागांवर संशोधनपर लेखन केले आहे. २०१३ पासून त्या राईस (RAYS) या संस्थेशी जोडलेल्या असून एचआयव्ही बाधित अन् अनाथ मुलांसाठी समुपदेशक आणि नाट्य शिक्षक म्हणून काम करतात.

राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी चेन्नईच्या भारत सेवक समाजमधून फिल्म अँड थिएटर ॲक्टिंगचा डिप्लोमा केला. देशातील १८ पेक्षा जास्त राज्यांत त्यांनी नाटकाचे प्रयोग केले आहेत. गोवा, आसाम, झारखंड, उत्तराखंड अन् उत्तर प्रदेशातील महोत्सवांमध्ये त्यांचा सत्कार झाला आहे.

गुरूच्या ध्येयाचा वारसा पुढे
३१ जानेवारी २०२५ रोजी त्यांचे गुरू राजू ताम्हाणकर यांचे निधन झाले. गुरूच्या जाण्यानंतरही त्यांनी नाटकाची चळवळ थांबू दिली नाही. त्यांनी हेमचंद्र राजू ताम्हाणकर स्मृती नाट्य समारोह आयोजित करून 'व्यथा अंगराज कर्ण की' या एकपात्री नाटकाचा प्रयोग यशस्वीपणे सादर केला. सध्या त्या ताम्हाणकर थिएटर अकादमीच्या सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

सामाजिक दबावामुळे शिक्षण सोडावे लागलेल्या गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काम करणे, हे अर्शिया यांचे मुख्य ध्येय आहे. जयपूरच्या गल्लीबोळातून सुरू झालेला हा प्रवास स्वप्न पाहणाऱ्या अन् ते जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी एक मोठी प्रेरणा आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter