मंसूरुद्दीन फरीदी
कलेचे काम केवळ सौंदर्य निर्माण करणे एवढेच नसते, तर समाजाला एक सकारात्मक संदेश देणे हेही तिचे मुख्य ध्येय असायला हवे. म्हणूनच भंगारातील निरुपयोगी वस्तूंपासून अप्रतिम कलाकृती घडवण्याची कला पर्यावरण जनजागृतीचे एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरू शकते.
भोपाळ येथील बहुआयामी तरुण कलाकार मोहम्मद काशिफ यांच्यासाठी हे तत्त्वज्ञान केवळ एक आकर्षक विचार नसून प्रत्यक्ष अनुभव, सर्जनशील प्रयोग आणि नवनवीन शोधांच्या ध्यासातून साकारलेले वास्तव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअर ते कलाकार असा प्रवास करणारे मोहम्मद काशिफ हे धातूपासून भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे बनवण्यात हातखंडा असलेले कुशल शिल्पकार आहेत. ते स्टेनलेस स्टील, पितळ यांसारख्या विविध धातूंचा वापर करून निरुपयोगी तुकड्यांना अप्रतिम कलाकृतींमध्ये रूपांतरित करतात.
टाकाऊ भंगाराला कलेचा साज चढवून काशिफ यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कल्पकतेने केवळ प्रेक्षकांनाच अवाक केले नाही, तर कला आणि इंजिनिअरिंगच्या वर्तुळातही त्यांना मोठे कौतुक व मान मिळवून दिला आहे.
जरी काशिफ यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असले, तरी काहीतरी वेगळे आणि चौकटीबाहेरचे घडवण्याच्या ध्यासाने त्यांना पारंपारिक इंजिनिअरिंगच्या सीमांपलीकडे नेले. याच उत्साहाने शेवटी त्यांना शिल्पकलेच्या दुनियेत आणले आणि एक यशस्वी प्रयोगशील कलाकार म्हणून प्रस्थापित केले.
आपली कलात्मक कल्पनाशक्ती आणि तांत्रिक कौशल्य यांची अशी भन्नाट सांगड त्यांनी घातली आहे की, मशीनचे भंगार भाग आणि निर्जीव धातूचे तुकडे पाहता पाहता मनमोहक शिल्पे अन् विलक्षण मेकॅनिकल कलाकृतींमध्ये बदलून जातात.
त्यांच्या कलाकृतींमध्ये कलात्मक सौंदर्य आणि इंजिनिअरिंगची अचूकता या दोन्ही गोष्टींची अप्रतिम झलक दिसते. याच अनोख्या संगमाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिला आहे.
भंगारात दडलेल्या कलाकृतींचा शोध
'आवाझ-द-व्हॉईस'शी बोलताना मोहम्मद काशिफ यांनी आपले साधे-सोपे तत्त्वज्ञान स्पष्ट केले. एखादी वस्तू जर पुन्हा वापरून सुंदर आणि अर्थपूर्ण बनवता येत असेल, तर तिला कचरा म्हणून फेकून देण्याचे काहीच कारण नाही.
याच विश्वासाने त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कल्पनेला आपल्या कलाप्रवासाचा महत्त्वाचा भाग बनवले आहे. त्यांच्या अनेक कलाकृती निसर्ग आणि पर्यावरणाच्या आव्हानांवर आधारित आहेत, ज्याद्वारे ते पर्यावरण संरक्षणाचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करतात.
काशिफ यांचे काम केवळ पारंपारिक शिल्पकलेपुरते मर्यादित नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणामुळे त्यांना कलेकडे तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता आले आणि गुंतागुंतीच्या कल्पनांना प्रत्यक्ष कलाकृतीत उतरवणे सोपे झाले.
इंजिनिअरिंगचे कौशल्य आणि कलात्मक विचार यांची सांगड घालून पारंपारिक विचारांना आव्हान देणाऱ्या आणि काहीतरी पूर्णपणे वेगळे घडवणाऱ्या कलाकृती निर्माण करणे हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.
लहानपणीच्या खेळण्यांपासून रोबोटिक्सपर्यंतचा प्रवास
आपल्यातील सर्जनशील उत्सुकतेची सुरुवात लहानपणीच झाल्याचे मोहम्मद काशिफ आठवतात. खेळण्यांबद्दल असलेल्या आकर्षणातूनच त्यांची रोबोटिक्समधील आवड विकसित झाली.
इतर मुलांसारखे खेळण्यांशी फक्त खेळण्याऐवजी, काशिफ ती खेळणी मोडून आतील भाग कसे काम करतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. त्यांच्या आई-वडिलांनीही या उत्सुकतेला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रयोगांना पाठिंबा दिला.
शालेय जीवनात चित्रकला स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागाच्या आठवणी ते आवर्जून सांगतात. या स्पर्धा जिंकणे म्हणजे केवळ बक्षीस मिळवणे नव्हते, तर आपल्यातील लपलेल्या कलाकाराची ओळख पटणे होते.
शाळेत असताना वेगवेगळ्या कलाकृतींकडे पाहून काशिफ विचार करायचे की, आपणही असे काहीतरी वेगळे बनवू शकतो का, जे पाहून लोकांनी क्षणभर थांबून विचार करावा?
त्यांनी घरात पडलेल्या टाकाऊ वस्तू आणि रोजच्या वापराच्या साहित्यातून प्रयोग करण्यास सुरुवात केली. लोक ज्या वस्तूंना निरुपयोगी समजून फेकून देतात, त्या वस्तूंबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते. हेच सुरुवातीचे लहान-सहान प्रयोग पुढे जाऊन त्यांच्या कलाप्रवासाचा भक्कम पाया ठरले.
टीकेची पर्वा न करता सुरू राहिलेला प्रवास
कलेच्या दुनियेत पाऊल ठेवणे मोहम्मद काशिफ यांच्यासाठी मुळीच सोपे नव्हते. काहींनी त्यांच्या या छंदाला वेळेचा अपव्यय ठरवले, तर काहींनी त्यांच्या प्रयत्नांची टवाळीही केली. मात्र, त्यांनी टीकेमुळे स्वतःचा उत्साह कधीही कमी होऊ दिला नाही.
कॉलेजच्या दिवसांत सुरुवातीला त्यांनी आपली कलात्मक बाजू इतरांपासून गुप्त ठेवली होती. इंजिनिअरिंगची पदवी घेतानाच ते शांतपणे आपल्या सर्जनशील कल्पनांवर काम करत राहिले.
काशिफ यांच्या मते, इंजिनिअरिंगच्या अभ्यासामुळे त्यांच्यातील कलेचा ध्यास अधिक मजबूत झाला. मशिन्सचे कार्य समजून घेतल्यामुळे केवळ तांत्रिक ज्ञान वाढले नाही, तर नवीन कल्पनांचे प्रयोग करण्याचा आत्मविश्वासही मिळाला.
त्यांच्या या प्रवासात एक मोठा बदल पदवीच्या दुसऱ्या वर्षात आला, जेव्हा त्यांनी नारळाच्या झाडाचे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण शिल्प साकारले. सुरुवातीला काशिफ आपली कलाकृती लोकांसमोर मांडण्यास कचरत होते. एका प्रदर्शनात ते शिल्प ठेवल्यानंतर, लोक हसतील या भीतीने ते स्वतःच्या स्टॉलपासून दूर जाऊन उभे राहिले. पण तिथे घडलेला प्रकार पूर्णपणे अनपेक्षित होता.
प्रदर्शनाला आलेल्या लोकांना ते शिल्प प्रचंड आवडले आणि त्याचे फोटो पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांतच त्यांच्या कलात्मक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. या एका अनुभवाने त्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढवला आणि कलेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा दिली.
जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व
कामाची वाढती लोकप्रियता पाहून त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय संधींचे दरवाजे उघडले. २०१९ मध्ये दुबईत भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोहम्मद काशिफ यांना निमंत्रण मिळाले, जो त्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.
या निवडीची प्रक्रिया खूप कठीण होती. सुमारे ४०० अर्जदारांमधून भोपाळमधील प्रदर्शनासाठी ४० कलाकारांची निवड झाली. त्यातून केवळ आठ कलाकारांना दुबईतील कार्यक्रमासाठी निवडले गेले. या आठ कलाकारांमध्ये काशिफ यांचा समावेश होता.
या अनुभवाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. ज्या कौशल्याला टीकेच्या भीतीने त्यांनी एकेकाळी लपवले होते, तीच त्यांची सर्वात मोठी ओळख बनली होती. 'वर्ल्ड आर्ट दुबई'मध्ये सहभागी होण्याव्यतिरिक्त, मोहम्मद काशिफ यांनी आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यांच्या प्रयोगात्मक कलाकृतींनी विविध आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड बुक्समध्ये स्थान मिळवले आहे, ज्यामुळे एक कलाकार आणि प्रयोगशील संशोधक म्हणून त्यांची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली आहे.
इंजिनिअरिंग आणि कलेचा सुवर्णसंगम
'आवाझ-द-व्हॉईस'शी बोलताना काशिफ यांनी स्पष्ट केले की, इंजिनिअरिंग आणि कला या दोन वेगळ्या दुनिया नाहीत; उलट त्या एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्या मते, इंजिनिअरिंग हे संकल्पनेला भक्कम रचना, अचूकता आणि व्यावहारिक रूप देते, तर कला तिला कल्पकता, सौंदर्य आणि सर्जनशील अभिव्यक्ती प्रदान करते.
याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी धातू, स्टील, लाकूड आणि भंगारातील वस्तूंवर प्रयोग करत अशा कलाकृती तयार केल्या ज्या पाहणाऱ्याचे लक्ष क्षणात वेधून घेतात.
२०१७ मध्ये मोहम्मद काशिफ यांनी 'आर्टिस्टिक इंजिनिअरिंग' (Artistic Engineering) हा आपला स्टार्टअप सुरू केला आणि कला अन् इंजिनिअरिंगला एकाच व्यासपीठावर आणले.
त्यांची कंपनी इंटीरियर अन् एक्सटीरियर डिझाईन, मेटल आर्ट, स्टील फॅब्रिकेशन, कस्टमाईज्ड कारंजे, ऑटोमेटेड गेट्स आणि विविध वास्तुकला प्रकल्पांवर काम करते. कुशल कारागिरांची एक टीम या सर्व प्रकल्पांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्यासोबत काम करते.
काशिफ यांच्यासाठी प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे केवळ भौतिक बांधकाम नसते, तर सौंदर्याचा आणि तांत्रिक कौशल्याचा मेळ घालण्याची एक मोठी संधी असते.
काशिफ यांच्या थक्क करणाऱ्या कलाकृती
मोहम्मद काशिफ यांच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींपैकी एक म्हणजे १५,००० वापरलेल्या प्लास्टिक बॉटल्सपासून बनवलेला 'प्लास्टिक बॉटल ग्लोब', जो भोपाळच्या लेक व्ह्यू परिसरात बसवण्यात आला आहे. पुनर्वापर (Recycling) आणि पर्यावरण जनजागृतीचा एक उत्तम नमुना म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते.

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या हस्ते या कलाकृतीचे उद्घाटन झाले होते, ज्यामुळे या प्रकल्पाला आणि त्यातील पर्यावरणाच्या संदेशाला मोठी प्रसिद्धी मिळाली. काशिफ यांच्या कामात २० फूट उंच स्टील ग्लोबपासून ते विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटशी संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. त्यांची प्रकाशमान शिल्पे आणि भव्य कलाकृती त्यांच्या तांत्रिक कौशल्याची साक्ष देतात.
त्यांच्या इतर प्रमुख कलाकृतींमध्ये मेटल अम्ब्रेला (धातूची छत्री), बटरफ्लाय स्कल्पचर (फुलपाखराचे शिल्प), गोल्डन स्पिअर, कायनेटिक विंड स्पिनर, स्क्रॅप रोबोटिक्स शिल्पे आणि इनव्हिजिबल क्वांटम शिल्पे यांचा समावेश आहे. प्रत्येक कलाकृती त्यांच्या चौकटीबाहेरच्या विचारांची आणि शिल्पकलेत नवीन शक्यता शोधण्याच्या ध्यासाची साक्ष देते.
पुरस्कार अन् बहुमान
मोहम्मद काशिफ यांच्या कलात्मक कामगिरीला अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवले गेले आहे. मुंबईतील ताज लँड्स एंड येथे आयोजित 'लक्झरी लाईफस्टाईल अँड बिझनेस अवॉर्ड्स २०२६' मध्ये त्यांना मध्यप्रदेशचे 'इनोव्हेटिव्ह आर्टिस्ट अँड स्कल्पटर ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेत्री किआरा अडवाणी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या 'आर्टिस्टिक इंजिनिअरिंग' या ब्रँडखाली काशिफ धातू आणि भंगाराचा वापर करून नवनवीन कलाकृती साकारत आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये नोएडामध्ये पार पडलेल्या 'बझ एक्स्पो अँड अवॉर्ड्स'मध्ये त्यांना 'बेस्ट आर्टिस्ट ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवले गेले.
पूर्वी, 'लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड्स २०२२' मध्ये त्यांना 'यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रुनर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला होता, जो बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आला होता. भोपाळच्या बोट क्लबवर १५,००० टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा वापर करून ५०० किलो वजनाचा ग्लोब तयार करणे ही त्यांची मोठी कामगिरी ठरली.
सिंगल-यूज प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगण्यासाठी आणि लोकांना पर्यावरणाप्रति जागरूक करण्यासाठी ही कलाकृती डिझाईन केली गेली होती. या कलाकृतीची नोंद 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये झाली आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्त्व: मोहम्मद काशिफ
इंजिनिअरिंग आणि शिल्पकलेव्यतिरिक्त मोहम्मद काशिफ यांना खेळांचीही प्रचंड आवड आहे. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेट आणि फुटबॉलची आवड असून त्यांनी विविध स्तरांवर स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना रायफल शूटिंगचीही आवड असून त्यांनी राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
खेळांमधील हा सहभाग त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आणि नवनवीन क्षेत्रे अनुभवण्याच्या उत्साहाची प्रचीती देतो. आपल्या स्वप्नवत प्रकल्पाबद्दल बोलताना काशिफ सांगतात की, त्यांना जगातील सर्वात मोठी, भव्य आणि 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये नोंद होईल अशी एक कलाकृती साकारायची आहे.
केवळ वैयक्तिक ओळख मिळवणे हा त्यामागचा हेतू नसून, आपल्या अफाट कलेच्या जोरावर देशाला मान मिळवून देणे हे त्यांचे स्वप्न आहे. मोहम्मद काशिफ यांचा हा प्रवास सिद्ध करतो की सर्जनशीलता कोणत्याही एका विषयापुरती किंवा व्यवसायापुरती मर्यादित नसते.
उत्सुकता, जिद्द, प्रचंड मेहनत आणि प्रयोगांचे धैर्य असेल, तर एक मेकॅनिकल इंजिनिअरही धातूमध्ये कला शोधू शकतो आणि भंगारातील टाकाऊ वस्तूंना कलाकृतींमध्ये बदलू शकतो.
टाकाऊ वस्तूंना नवीन जीवन देऊन काशिफ केवळ अप्रतिम शिल्पेच बनवत नाहीत, तर पर्यावरणाच्या रक्षणाचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेशही समाजाला देत आहेत. त्यांच्यासाठी भंगारातील प्रत्येक तुकड्यात एक सुंदर, अर्थपूर्ण आणि विलक्षण कलाकृती बनण्याची शक्यता दडलेली असते.