बॉक्स ऑफिसवर 'मैं वापस आऊंगा'ची बाजी; दुसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मैं वापस आऊंगा' चित्रपटाच्या यशाने दिग्दर्शक इम्तियाज अली भारावून गेले; प्रेक्षकांचे मानले आभार
मैं वापस आऊंगा' चित्रपटाच्या यशाने दिग्दर्शक इम्तियाज अली भारावून गेले; प्रेक्षकांचे मानले आभार

 

नवी दिल्ली 

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारत आहे. पहिल्या तीन दिवसांत संथ सुरुवात केल्यानंतर, या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर दमदार टर्नअराउंड केला आहे. प्रेक्षकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून इम्तियाज अली भारावून गेले आहेत.

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

'मैं वापस आऊंगा' या चित्रपटाने आपल्या प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करत ५.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमावला. देशभरातील १,९७१ शोजमधून मिळालेला हा प्रतिसाद पाहून चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. इम्तियाज अली म्हणतात, "शेवटी 'जनता जनार्दन' असते. आपण प्रेक्षकांना वेगवेगळ्या वर्गात विभागून त्यांच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात प्रेक्षकांना सिनेमाची उत्तम जाण असते. चित्रपट कसा बनवावा आणि त्याचे मार्केटिंग कसे करावे, हे खरं तर आपण त्यांच्याकडून शिकायला हवे."

बॉक्स ऑफिसवर घोडदौड

हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात १२.२५ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, दुसऱ्या आठवड्यात मात्र चित्र पूर्णपणे पालटले. अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपयांची कमाई करत पहिल्या आठवड्याच्या बरोबरीने आकडा गाठला आहे. चित्रपटाची एकूण नेट कलेक्शन आता २४.२५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

नसीरुद्दीन शाह, दिलजीत दोसांझ, वेदांग रैना आणि शर्वरी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट फाळणीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. ए. आर. रहमान यांचे संगीत आणि इरशाद कामिल यांच्या गीतलेखनामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या वाढत्या मागणीमुळे वितरक आणि थिएटर मालकांनी शोजची संख्या वाढवली आहे, ज्याबद्दल इम्तियाज अली यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.