एक कहाणी : फाळणीच्या भयंकर जखमेतून जन्माला आलेल्या बॉलिवूडच्या किंग खानची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब
शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब

 


जीवनातील अनेक लहान-मोठ्या प्रसंगांमुळे व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य भविष्य बदलून जाते. अशाच प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील मनाला भिडणाऱ्या प्रसंगांचा पट आपण 'एक कहाणी' या खास मालिकेतून उलगडत आहोत. आजची कथा आहे बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान आणि त्याच्या वडिलांच्या संघर्षमय इतिहासाची. 

एका क्षणाने बदलले भविष्य
गोष्ट थोडी विचित्र वाटेल पण इतिहासाच्या पानांमध्ये एक अनोखे वळण आले नसते, तर आज कदाचित शाहरुख खान पेशावरच्या एखाद्या गल्लीतच राहून गेला असता. शाहरुख खान आज ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्याची पायाभरणी भारत-पाकिस्तान फाळणीच्या त्या भयंकर आणि राजकीय काळात रचली गेली. त्या काळात त्याच्या वडिलांना स्वतःचे घरदार सोडून भारतात यावे लागले.

पाकिस्तानमध्ये प्रकाशित झालेल्या ‘मै क्यों नहीं टूटा?’ या पुस्तकातून या अज्ञात इतिहासाचा उलगडा झाला आहे. डॉ. मोहम्मद सुहैल खान यांनी हाजी गुलाम अहमद बिलौर यांच्याशी दोन वर्षे केलेल्या संवादाच्या आधारे हे पुस्तक लिहिले आहे.

तीन मित्रांची घट्ट मैत्री अन् फाळणीचा घाव
स्वातंत्र्यापूर्वी खैबर पख्तूनख्वा भागात स्वातंत्र्याची मोठी लाट उसळली होती. त्या काळात तीन तरुण मित्रांच्या मैत्रीचे किस्से प्रचंड गाजायचे. त्यामध्ये शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद, बिलौर दीने आणि डॉ. अब्दुल कयूम खान. हे सर्वजण काँग्रेस आणि खान अब्दुल गफ्फार खान यांच्या खुदाई खिदमतगार आंदोलनात सक्रिय होते.

परंतु १९४७ च्या फाळणीने ही समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली. मुस्लिम लीगचा प्रभाव वाढताच कयूम खान यांनी काँग्रेस सोडून जिन्नांची साथ धरली. फाळणीनंतर कयूम खान खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री झाले. सत्ता मिळताच कयूम खान यांनी आपले जुने मित्र ताज मोहम्मद यांच्यावर मुस्लिम लीगमध्ये येण्यासाठी प्रचंड दबाव आणायला सुरुवात केली.

तुरुंगवास, छळ अन् मातृभूमीचा त्याग
ताज मोहम्मद तत्त्वनिष्ठ माणूस होते. त्यांचा जीव भारतातच अडकल्याचा संशय कयूम खान यांना होता. ताज मोहम्मद यांनी मुस्लिम लीगमध्ये येण्यास ठाम नकार दिला. तिथूनच जुन्या मित्रांमध्ये शत्रूत्वाचा काळ सुरू झाला. कयूम खान यांनी आपल्याच जुन्या मित्राचा छळ सुरू केला. 

ताज मोहम्मद यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले. त्यांना वारंवार तुरुंगात डांबले गेले. या राजकीय सूडबुद्धीने ताज मोहम्मद यांच्या स्वाभिमानाला मोठी ठेच पोहोचवली. अखेर अन्यायाची हद्द ओलांडल्यावर ताज मोहम्मद यांनी अत्यंत दुःखी मनाने पेशावर सोडले आणि ते भारतात निघून आले. भारतात आल्यावर त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली, लग्न झाले आणि याच मातीत जन्म झाला—शाहरुख खानचा!

जर ते पाकिस्तानातच राहिले असते तर?
पुस्तकात डॉ. सुहैल खान लिहितात, "जर त्या वेळी ताज मोहम्मद यांच्यावर हा अन्याय झाला नसता, तर ते कदाचित पेशावर सोडून कधीच गेले नसते. ते पाकिस्तानातच राहिले असते, तर भारताला आणि बॉलिवूडला त्यांचा किंग मिळाला नसता."

इतिहासातील एका अन्यायाने ताज मोहम्मद यांच्याकडून त्यांची जन्मभूमी हिरावून घेतली. परंतु त्याच एका प्रसंगाने जगाला त्याचा सर्वात मोठा सुपरस्टार दिला.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter