विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करताना मौलाना हलीम उल्लाह काझमी आणि आमदार अमीन पटेल
भक्ती चाळक
एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, ही आपली जुनी भारतीय संस्कृती आहे. परंतु हेच दान हजारो तरुण-तरुणींच्या स्वप्नांना पंख देणारे असेल तर ते समाजापुढे येणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईच्या काळात उच्च शिक्षणाची फी भरणे सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जाते. अशावेळी जमियत उलमा-ए-महाराष्ट्रची उपसंस्था असलेल्या 'मुक्ती किफायत उल्लाह मेमोरियल ट्रस्ट'च्या वतीने मुंबईत गरजू विद्यार्थ्यांना २० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे धनादेश वाटण्यात आले.
३५० विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ
शिष्यवृत्तीच्या पहिल्या टप्प्यातील या यादीत तब्बल ३५० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा जातीचा विचार केला गेलेला नाही. एकूण ३५० लाभार्थ्यांमध्ये २१ गैर-मुस्लिम विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासोबतच विधी शाखेचे (LLB आणि LLM) १९ विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत.
कोणताही भेदभाव न करता, केवळ शैक्षणिक गुणवत्ता आणि कौटुंबिक गरज पाहून मदतीचा हात पुढे करण्याची ही संस्था खऱ्या अर्थाने तरुणाईचे भविष्य घडवण्याचे कार्य करतेय. या शिष्यवृत्ती वाटपाच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पोलीस, राजकीय नेते आणि धार्मिक विद्वान मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच जमियतच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा मनमोकळेपणाने गौरव केला.
शिष्यवृत्ती का गरजेची वाटली
अनेकदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पालकांना फी भरण्यासाठी कर्ज काढावे लागते. अशा वेळी ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वेळेवर मिळते का आणि पुढील टप्प्यात किती निधी वाटला जाणार, याविषयी मौलाना हलीम उल्लाह काझमी यांनी सविस्तर माहिती दिली.
शिष्यवृत्ती मिळण्यास होणाऱ्या विलंबाबाबत बोलताना मौलाना हलीम उल्लाह काझमी म्हणाले की, "कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत सुरुवातीला फीची अनिश्चितता असते. जोपर्यंत संबंधित कॉलेज किंवा अभ्यासक्रमाची नेमकी फी किती आहे याचे अधिकृत कागदपत्र समोर येत नाही, तोपर्यंत रक्कमेचे वाटप करणे कठीण असते. परंतु ज्या विद्यार्थ्याला खरोखरच तातडीची अडचण असते आणि तो तशी विनंती करतो, अशा विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर आम्ही आधीच पैसे जमा करतो."
पुढे शैक्षणिक व वैद्यकीय निधीच्या नियोजनाबाबत बोलताना ते म्हणाले की, "चालू शैक्षणिक वर्षात शिक्षणासाठी ४० लाख रुपये आणि वैद्यकीय उपचारांच्या मदतीसाठी ३० लाख रुपये असा एकूण ७० लाख रुपयांचा मोठा निधी राखीव ठेवण्यात आला आहे."
दुसऱ्या टप्प्यातील मदतीबाबत स्पष्टता देताना ते म्हणाले की, "सध्या वैद्यकीय आणि इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्या अजूनही सुरू आहेत. त्यांच्या फीची स्पष्टता आल्यानंतर लगेचच उर्वरित विद्यार्थ्यांना मदत दिली जाईल. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दुसरी हप्ता जारी केला जाईल. गरज भासल्यास शिक्षणासाठीच्या निधीत आणखी वाढ केली जाईल."
सध्या पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या सोहळ्याला उपस्थित असलेले खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "शिक्षणाच्या शस्त्रामुळे सामान्य व्यक्तीचे आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलू शकते. मुक्ती किफायत उल्लाह मेमोरियल ट्रस्टने ही ताकद तरुण पिढीच्या हाती देऊन अत्यंत मोलाचे कार्य केले आहे."
आमदार अमीन पटेल यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "समाजाचा खरा विकास करायचा असेल, तर शिक्षणात गुंतवणूक करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवणे हाच सर्वात उत्तम आणि मार्गदर्शक मार्ग आहे. जमियतने शिक्षण आणि समाजकल्याणासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे."
यावेळी उपस्थित असलेले निझामुद्दीन राईन यांनी सांगितले की, "धर्म आणि पंथाच्या भिंती ओलांडून गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, हीच खरी मानवतेची सेवा आहे. हा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा."
तसेच माजी आमदार हाजी बशीर मुसा पटेल म्हणाले की, "ट्रस्टने वर्षानुवर्षे जपलेली मदतीची ही परंपरा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. यामुळे अनेक मुलांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित झाले आहे."
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना जमियतचे अध्यक्ष मौलाना हलीम उल्लाह काझमी यांनी सर्व उपस्थितांना आपापसातील प्रेम, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपण्याचे मनापासून आवाहन केले.
आजच्या धावपळीच्या आणि काहीशा गढूळ झालेल्या वातावरणात सर्व धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शिरावर घेतल्याने संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जमियत उलमा-ए-महाराष्ट्रने सुरू ठेवलेला हा शैक्षणिक यज्ञ असाच अविरत सुरू राहो आणि त्यातून हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघो, हीच या निमित्ताने सदिच्छा.