काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतली राज्यसभेची शपथ; पुन्हा विरोधी पक्षनेतेपदी निवड

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पुन्हा खासदारकीची शपथ घेताना मल्लिकार्जुन खर्गे
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पुन्हा खासदारकीची शपथ घेताना मल्लिकार्जुन खर्गे

 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ८ नवनियुक्त सदस्यांनी सोमवारी राज्यसभेचे खासदार म्हणून अधिकृतपणे शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी या सर्व सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

यासोबतच मल्लिकार्जुन खर्गे यांची २६ जून २०२६ पासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या या शपथविधी सोहळ्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.

हातात संविधान घेऊन मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतली शपथ
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दालनात स्वतंत्रपणे शपथ घेतली. यावेळी त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती. शपथ घेतल्यानंतर खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली भूमिका मांडली.
 
ते म्हणाले की, संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून देशसेवा करणे ही अत्यंत अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. जनतेच्या आकांक्षा, त्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज मी अत्यंत प्रामाणिकपणे सभागृहात मांडत राहीन आणि सरकारला जनतेप्रती उत्तरदायी बनवण्याचे काम सुरूच ठेवेन.

८ खासदारांचा शपथविधी
मल्लिकार्जुन खर्गे यांच्याव्यतिरिक्त इतर ७ नवनियुक्त आणि पुनर्नियुक्त सदस्यांना राज्यसभेच्या मुख्य सभागृहात शपथ देण्यात आली. यामध्ये मानसिंह मेरामन परमार, तरुण चुग, अलका सिंग, जितेंद्र मेघजीभाई कझारिया, राजेंद्र हिरामल जैन, एम. नागराजा आणि अधिकारिमयुम शारदा देवी यांचा समावेश आहे.
 
या खासदारांपैकी ४ सदस्यांनी हिंदीत, तर प्रत्येकी एका सदस्याने कन्नड, पंजाबी आणि मणिपुरी भाषेत शपथ घेतली. हे नवनियुक्त खासदार गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर आणि राजस्थान या राज्यांचे प्रतिनिधित्व करतात.

या ऐतिहासिक प्रसंगी काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार प्रियांका गांधी वाड्रा, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासह खर्गे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच सत्ताधारी पक्षाकडून आरोग्यमंत्री आणि सभागृह नेते जे. पी. नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते. 

खर्गे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २५ जून रोजी संपल्यामुळे त्यांचे विरोधी पक्षनेतेपद संपुष्टात आले होते, मात्र २६ जूनपासून त्यांच्या पुनर्निवडीनंतर त्यांना पुन्हा कायदेशीररित्या विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.