भारतात ३३ एलिफंट रिझर्व्ह आणि २२ हजारांहून अधिक हत्ती; जागतिक हत्ती दिनानिमित्त पंतप्रधानांचे कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

जगातील एकूण रानटी आशियाई हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात असून, त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी देशात ३३ एलिफंट रिझर्व्ह उभारण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जागतिक हत्ती दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांनी देशातील हत्ती संवर्धनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जागतिक हत्ती दिनानिमित्त आपण हत्तींच्या या भव्य आणि राजेशाही अस्तित्वाचा उत्सव साजरा करत आहोत. हत्ती हा भारताच्या पर्यावरणीय वारशाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. हत्तींच्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणारे वन कर्मचारी, शास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, माहुत आणि स्थानिक समुदायांच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे."

दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. या प्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनीही हत्ती आणि मानवाच्या सहअस्तित्वाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारताने १५० वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित एलिफंट कॉरिडोअर, अत्याधुनिक लोकसंख्या निरीक्षण यंत्रणा आणि अधिक कडक सुरक्षा उपायांसह हत्ती संवर्धन अधिक मजबूत केले आहे, असे भूपेंद्र यादव यांनी नमूद केले.

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी पुढे सांगितले, "जेव्हा आपण हत्तींचे भविष्य सुरक्षित करतो, तेव्हा आपण आपली जंगले, जैवविविधता आणि नैसर्गिक वारसा सुरक्षित करत असतो. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी हत्ती भारताच्या जंगलात आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरत राहतील याची खात्री आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे."

'सिनक्रोनस ऑल इंडिया पॉप्युलेशन एस्टिमेशन ऑफ एलिफंट्स २०२१-२५' च्या आकडेवारीनुसार, भारतात सध्या २२,००० हून अधिक रानटी हत्ती आहेत. हत्तींचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध पातळीवर उपाययोजना राबवल्या जात आहेत.