नवी दिल्ली
लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांचा नवीन कॉमेडी स्पेशल 'पापा यार' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून याबद्दलची माहिती दिली असून, एक टीझरही शेअर केला आहे.
या टीझरमध्ये झाकीर खान त्यांचे वडील उस्ताद इस्माईल खान यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. "लवकरच बाबांचा स्पेशल दिवस येणार आहे, 'पापा यार' लवकरच फक्त नेटफ्लिक्सवर," अशी कॅप्शन देत ही घोषणा करण्यात आली आहे. झाकीर खान यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.
झाकीर खान यांनी जून २०२५ मध्ये सुरू केलेली त्यांची 'पापा यार' टूर नुकतीच पूर्ण केली आहे. या टूरचा शेवटचा शो मुंबईत पार पडला, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनी विशेष हजेरी लावली होती. झाकीर खान २०१२ मध्ये 'कॉमेडी सेंट्रल'ची 'इंडियाज बेस्ट स्टँड-अप कॉमेडियन' स्पर्धा जिंकल्यानंतर प्रकाशझोतात आले. 'हक से सिंगल', 'कक्षा', 'झाकीर खान: देलुलू एक्सप्रेस' यांसारख्या अनेक यशस्वी स्टँड-अप स्पेशलच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. आता 'पापा यार'च्या निमित्ताने ते पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत.