निधी अपहाराच्या आरोपांदरम्यान काँग्रेसचे शिष्टमंडळ आज अयोध्येत; राम ललाचे घेणार दर्शन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

श्री राम मंदिर निर्माणातील कथित निधी अपहाराच्या आरोपांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ मंगळवारी अयोध्येला भेट देऊन राम ललाचे दर्शन घेणार आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्रक काढून या दौऱ्याची माहिती दिली आहे. 

या दौऱ्यासाठी स्थानिक प्रशासनाला आधीच सूचित करण्यात आले होते. मात्र, हा दौरा होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना अयोध्येतील एका हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे.

अजय राय यांच्यावर निर्बंध
काँग्रेसने सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे उत्तर प्रदेश युनिट प्रमुख अजय राय यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ अयोध्येला जात आहे. या शिष्टमंडळात खासदार किशोरी लाल शर्मा (अमेठी), राकेश राठोड (सीतापूर), उज्ज्वल रमण सिंह (प्रयागराज) आणि तनुज पुनिया (बाराबंकी) यांचा समावेश आहे. 

त्यांच्यासोबत माजी खासदार एस. पी. गौतम, माजी आमदार आणि इतर ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. परंतु, अजय राय यांना हॉटेलमध्येच रोखून धरल्याने काँग्रेसने प्रशासनाच्या या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

विरोधकांवर टीका
काँग्रेसच्या या अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे मंत्री दयाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या या भूमिकेवर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. सिंह म्हणाले की, विरोधी पक्षाच्या नेत्यांचा प्रभू रामावर कधीच विश्वास नव्हता. त्यांनी रामाचे अस्तित्वही नाकारले होते. 

राम मंदिर उभारणीत त्यांचे कोणतेही योगदान नाही आणि त्यांनी कधी राम ललाचे दर्शनही घेतले नाही. आता केवळ राजकारण करण्यासाठी आणि देशसेवा करणाऱ्यांवर खोटे आरोप करण्यासाठी हे नेते अयोध्येला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे.