विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमीर खान पुन्हा मैदानात! नागपुरातील 'जलक्रांती परिषदे'त लावणार हजेरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

'पाणी फाउंडेशन'च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची मोठी लोकचळवळ उभी करणारे अभिनेते आमीर खान आता विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे'तर्फे नागपुरात दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिषदेत आमीर खान विशेष उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्यासोबतच शेतकऱ्यांसाठी झटणारे अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हेदेखील या जलमंथनात सहभागी होतील.

विदर्भातील जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ही परिषद खूप महत्त्वाची ठरणार आहे. गडकरी यांच्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त १७ आणि १८ मे रोजी नागपुरात हा 'जल संवाद' आणि 'जलक्रांती परिषद' पार पडेल. 'पाणी फाउंडेशन' आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून या कलाकारांनी जलसंधारणाचे मोठे काम उभे केले आहे. आता गडकरींच्या मंचावर हे सर्व दिग्गज एकत्र येत असल्याने या परिषदेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

रविवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी सविस्तर माहिती दिली. "विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या उपायांवर या परिषदेत मंथन होईल. संपूर्ण विदर्भातील शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने यात सहभागी होतील," असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

विदर्भातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी गडकरी आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते 'पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे'च्या माध्यमातून काम करत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हा या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संस्थेने उभे केलेल्या 'तामसवाडा पुनरुज्जीवन मॉडेल'ची आज देशभरात दखल घेतली जात आहे. सेलू तालुक्यातील सुमारे १२ किलोमीटर लांबीचा आणि जवळपास मृत झालेला तामसवाडा नाला यासाठी निवडण्यात आला. त्याचे यशस्वीपणे पुनरुज्जीवन करण्यात आले.

धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नचा सखोल अभ्यास करून या प्रकल्पाची पायाभरणी झाली. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मदतीने या संपूर्ण प्रकल्पाचे अचूक नियोजन करण्यात आले होते.

गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडणार आहे. देशभरातील अनेक पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ आणि संशोधक या परिषदेला उपस्थित राहतील. आमीर खान यांच्या 'पाणी फाउंडेशन'च्या अनुभवाचा आणि इतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter