आयझॉल
मिझोराममध्ये 'स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन' (SIR) मोहिमेनंतर मतदार यादीतून ४६,१९१ नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने ही मोहीम २० मे रोजी सुरू केली होती आणि ती रविवारी पूर्ण झाली. या प्रक्रियेनंतर आता मिझोराममधील एकूण मतदारांची संख्या ८,२८,८७७ इतकी झाली आहे.
मिझोरामच्या संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी एथेल रोथांगपुई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती. वगळण्यात आलेल्या ४६,१९१ नावांमध्ये प्रामुख्याने मृत व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले नागरिक, दुबार नोंदणी आणि पत्ता न सापडलेल्या मतदारांचा समावेश आहे. यात २१,२९० मृत व्यक्ती, १३,९९२ इतरत्र स्थलांतरित झालेले आणि २,२४५ दुबार नोंदणी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
ही मोहीम अशा वेळी पूर्ण झाली आहे, जेव्हा मिझोराममधील प्रभावशाली विद्यार्थी संघटना 'मिझो झिरलाई पॉल'ने (MZP) चकमाबहुल भागात मतदार यादीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या भागातील मतदारांच्या संख्येत असामान्य वाढ झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला होता. यावर निवडणूक आयोग संबंधित तक्रारींची तपासणी करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
येत्या ४ जुलै रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ५ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत नागरिक मतदार यादीबाबतचे आपले दावे आणि आक्षेप नोंदवू शकतील.