नवी दिल्ली
अमेरिकेतील एका प्रादेशिक न्यायालयाने उद्योगपती आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी तसेच त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यावरील सर्व फौजदारी आरोप कायमस्वरूपी फेटाळून लावले आहेत. न्यू यॉर्कच्या पूर्व जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती निकोलस गाराउफिस यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाचा (DoJ) खटला मागे घेण्याचा अर्ज मंजूर केल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर प्रकरणाचा अंत झाला आहे.
न्यायालयाने हा खटला 'विथ प्रेज्युडिस' (With Prejudice) म्हणजेच कायमस्वरूपी फेटाळला आहे, याचा अर्थ हे आरोप भविष्यात पुन्हा दाखल करता येणार नाहीत. नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकन फिर्यादींनी अदानी समूहावर सौर ऊर्जा करारांसाठी कथित लाच दिल्याचा आरोप केला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या काळात अमेरिकन न्याय विभागाने हा खटला पुढे चालवणे न्यायाच्या हितसंबंधात नसल्याचे स्पष्ट करत मागे घेतला. दरम्यान, न्याय विभागाची अंतर्गत प्रक्रिया आणि भूमिकेवर न्यायालयाने ताशेरे ओढले असले, तरी कायदेशीर बाजू तपासून हा निर्णय दिला आहे.
या निकालानंतर गौतम अदानी यांनी एक्स (X) वर पोस्ट करत न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि सत्य समोर आल्याचे म्हटले आहे. या संपूर्ण कठीण काळात ज्यांनी विश्वास कायम ठेवला, त्यांचे त्यांनी आभार मानले असून देशासाठी आणि राष्ट्रउभारणीसाठी काम करत राहण्याची आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अदानी समूहाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळले होते आणि आपण नियमांचे पालन केल्याचे स्पष्ट केले होते. खटला फेटाळल्यानंतर समूहाच्या प्रकल्पांना आणि आर्थिक स्थितीला मोठे बळ मिळाले आहे.