पुण्यात ५२ वर्षांपासून तिरंगा घडवणारी ‘शेख फॅमिली’

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
इलियास शेख आणि ऐमन शेख
इलियास शेख आणि ऐमन शेख

 

भक्ती चाळक 

तिरंगा पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येते. पण हाच राष्ट्रध्वज आपल्या हातात येण्यापूर्वी त्याच्या मागे कितीतरी हातांची मेहनत, समर्पण आणि निरपेक्ष प्रेम दडलेले असते. पुण्यातील एका छोट्याशा घरात गेल्या ५२ वर्षांपासून हाच राष्ट्रध्वज घडवण्याचे आणि घराघरांत पोहोचवण्याचे अभिमानास्पद काम तीन पिढ्यांपासून अविरत सुरू आहे.

कसबा पेठेत आलेल्या भीषण पुराच्या संकटातून सावरून पुन्हा उभे राहिलेल्या शेख कुटुंबाने ५० हजार राष्ट्रध्वज बनवण्यापर्यंतचा टप्पा पार केला आहे. व्यावसायिक नफ्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमापोटी शेख कुटुंब ही सेवा करत  आहे.

कसब्याच्या पुरातून सुरू झाला प्रवास
शेख कुटुंबाचा तिरंगा बनवण्याचा हा प्रवास ५२ वर्षांपूर्वी कसबा पेठेत सुरू झाला. कसब्यात राहणाऱ्या इलियास शेख यांच्या सासऱ्यांनी हे काम सुरू केले होते. पुढे पूर आला अन् महापालिकेने त्यांना दुसरीकडे पुनर्वसित केले. नवीन जागेत आल्यावरही त्यांनी राष्ट्रध्वज बनवण्याचे काम सोडले नाही.

घरातील सासू-सासऱ्यांचा हा वारसा पुढे त्यांच्या सुनेने आणि संपूर्ण कुटुंबाने अतिशय निष्ठेने सांभाळला. सुरुवातीला वर्षाला अवघे ४०० ते ५०० ध्वज बनवण्यापासून सुरू झालेले हे कार्य आज ५० हजार राष्ट्रध्वज बनवण्यापर्यंत पोहोचले आहे.

तीन महिने आधीच सुरू होतो देशभक्तीचा यज्ञ
१५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीच्या दोन-तीन महिने आधीच या घरात काम वेगाने सुरू होते. मंडईतून काड्या आणण्यापासून ते कागदाची कटिंग, रंगकाम अन् चिटकवण्यापर्यंत प्रत्येक काम घरातील सदस्य स्वतः करतात. चार ते पाच वेळा तोच झेंडा हातातून गेल्यावर शेवटी तो तयार होतो आणि त्याचे ५०-५० चे गुच्छ बनवून दुकानदारांना, फेरीवाल्यांना दिले जातात.

या कामाविषयीची आत्मीयता आणि कौटुंबिक भावना सांगताना इलियास शेख म्हणतात, “आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाचा प्रचंड आदर करतो. आम्ही हे काम कोणत्या नफ्यासाठी नाही, तर आवडीने आणि हसतखेळत करतो. आम्ही वर्षानुवर्षांपासून हे काम करत आलोय. जर आम्ही नियमितपणे झेंडे बनवले नाहीत, तर आमचे मनच लागत नाही. त्यामुळे यांच्या खुशीखातर मुलांचा झेंडे बनवण्याचा आग्रह असतो.”

नफ्यासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी अन् आनंदासाठी काम!
आजच्या काळात प्रत्येक जण फायद्या-तोट्याचा हिशोब मांडतो. पण शेख कुटुंब याला अपवाद आहे. मुलांची कमाई चांगली आहे, ईश्वराच्या कृपेने घरात समृद्धी आहे. परंतु तरीही हे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा त्यांचा हट्ट आहे.

देशप्रेमाबद्दल बोलताना इलियास पुढे म्हणतात, “हे काम करताना आम्हाला खूप आनंद होतो. जोपर्यंत आमच्या शरीरात जीव आहे, तोपर्यंत आम्ही झेंडे बनवत राहू. एकदा का हे काम सुटले, तर आम्हाला दुसरं काही सुचणारच नाही. अल्लाहची कृपा आहे, आमची मुले चांगली कमावतात. पण हे शुभ काम आम्ही देशासाठी करतो. यामुळे आमचे मन प्रसन्न राहते आणि देशसेवाचे पुण्य मिळते.”

घरातील नवीन पिढीची सूनसुद्धा या कामात तितक्याच हिरीरीने सहभागी होते. या कामात मिळणारा आनंद आणि देशप्रेमाची भावना व्यक्त करताना ऐमन शेख म्हणतात, “मला या कामाचा खूप अभिमान वाटतो. याआधी मी फक्त घर, शाळा आणि कॉलेज याच गोष्टी पाहिल्या होत्या. पण लग्नानंतर इथे आल्यावर कळले की घरात एवढे मोठे आणि नेक काम होते. मी या कामाचा एक भाग आहे आणि हे काम देशासाठी करतेय, याचा मला मनापासून खूप अभिमान वाटतो.”

‘ना हिंदू, ना मुस्लिम... फक्त भारत!’
आज समाजात अनेकदा धार्मिक भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला जातो. पण या शेख कुटुंबाच्या दारात आल्यावर या सगळ्या भिंती पार गळून पडतात. त्यांच्याकडे झेंडे न्यायला येणारा प्रत्येक जण फक्त आणि फक्त भारतीय म्हणून येतो.

आपल्या पूर्वजांचा वारसा पुढे नेण्यामागची भूमिका आणि निरपेक्ष देशप्रेम व्यक्त करताना इलियास पुढे म्हणतात, “या कामात आम्हाला खूप मोठा नफा मिळतो असं मुळीच नाही. पण आमच्या सासू-सासऱ्यांचा हा पिढीजात वारसा थांबता कामा नये. प्रत्येकाच्या हातात आणि घराघरांत तिरंगा असावा, याच एका ध्यासाने आणि देशभक्तीच्या भावनेने आम्ही हे कार्य करतो.”

त्या पुढे म्हणतात, “इथे आम्ही हिंदू-मुस्लिम असं काहीही पाहत नाही. आमच्याकडे येणारा माणूस फक्त भारताचा झेंडा न्यायला येतो. तो हिंदू आहे की मुस्लिम, हे ना ते सांगतात ना आम्ही विचारतो. ज्याला झेंडा हवा असतो, त्याला आम्ही तो आनंदाने देतो.”

पुण्याच्या कसबा पेठेतील या छोट्याशा घरात रोज तयार होणारा प्रत्येक तिरंगा हा खान कुटुंबाच्या भारताप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाचा अन् निष्ठेचा पुरावा आहे. इथे फायद्याचा हिशोब केला जात नाही, जात-धर्माची भेदाभेद होत नाही अन् फक्त ‘देश प्रथम’ हीच भावना जपली जाते.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter



Latest News