नवी दिल्ली
मतदारांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉकरोच जनता पक्षाने (CJP) गुरुवारी केली. त्यांनी राजीनामा न दिल्यास 'जंतरमंतर २.०' सह देशभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरोप केला की, सध्याची निवडणूक प्रक्रिया संशयास्पद असून नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. जर ज्ञानेश कुमार यांनी आगामी ४८ तासांत राजीनामा दिला नाही, तर आम्ही देशभरात मोठे आंदोलन उभारू आणि दिल्लीत येऊन 'जंतरमंतर २.०' नक्कीच पार पाडेल, असे दिपके यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांनाही आवाहन केले की, जर निवडणुकांमध्ये फेरफार होत असल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर त्यात सहभाग घेऊ नका. तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले. ज्ञानेश कुमार हे भारतीय लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका बनल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांपैकी दोन आयुक्तांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याचा अहवाल समोर आल्यानंतर या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. गेल्या १० महिन्यांत दोन्ही आयुक्तांनी किमान १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवले होते, त्यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडूनही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.