मलिक असगर हाशमी
‘एक कहाणी’ ही आपली नवी मालिका. ज्या प्रसिद्ध व्यक्तींना आपण पडद्यावर किंवा जनमानसात पाहतो, त्यांच्या आयुष्यात घडलेले काही हळवे प्रसंग यात आपण मांडणार आहोत. कधी पश्चात्तापाची झालर असलेला, तर कधी एखाद्या वळणावर जगणं पार बदलून टाकणारा असा एखादा क्षण... चला तर मग, आज अनुभवूयात एका कलाकृतीचा आत्मा शोधणारा हा रंजक प्रसंग.
रूमीचा तो एक संदेश
सूफी परंपरेत संगीत आणि नृत्याला भक्तीचा दर्जा देणारे महान सूफी संत आणि कवी मौलाना जलालुद्दीन रूमी यांची एक ओळ दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यापर्यंत पोहोचली नसती, तर काय झाले असते? कदाचित 'रॉकस्टार' हा चित्रपट इतिहास रचू शकला नसता आणि आपल्याला 'नादान परिंदे' हे कालजयी गाणेही मिळाले नसते.
हा प्रसंग आहे त्या काळातील, जेव्हा रणबीर कपूरचे सुरुवातीचे चित्रपट फारशी कमाल दाखवू शकत नव्हते. दुसरीकडे, इम्तियाज अली आपला पहिला चित्रपट 'सोचा न था' चार वर्षे रखडल्यामुळे प्रचंड निराश होते. स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते सातत्याने नव्या कथा लिहीत होते. याच काळात 'रॉकस्टार'चा पाया रचला गेला.
इम्तियाज यांनी ही कथा सुरुवातीला जॉन अब्राहमचा विचार करून लिहिली होती. रणबीर कपूर या चित्रपटात असेल असे त्यांना वाटलेही नव्हते. पण नियतीचे नियोजन वेगळेच होते. एका भेटीत रणबीरने हसत विचारले, "तुम्ही 'रॉकस्टार' नावाची कथा लिहिली आहे ना? आपण दोघे मिळून हा चित्रपट करूयात, मी यात काम करतो!" इम्तियाज यांनी होकार दिला आणि प्रवास सुरू झाला.
जेव्हा चित्रपटाचा आत्माच हरवला होता...
चित्रपटाला ऑस्करविजेते ए. आर. रहमान संगीत देत होते. चित्रपटातील सर्वात महत्त्वाचा आणि वेदनादायी प्रसंग चित्रीत झाला होता. जॉर्डन (रणबीर कपूर) रुग्णालयाबाहेर आहे, पोलीस त्याला फरफटत नेतात, भोवती गर्दीचा गदारोळ आहे आणि जॉर्डनच्या चेहऱ्यावर एक अथांग एकाकीपण आहे.
प्रेक्षकांचे काळिज पिळवटून टाकेल अशा गाण्याची या प्रसंगाला गरज होती. अनेक प्रयत्न झाले, पण गाण्याचे बोल काही जुळून येत नव्हते. शेवटी उद्विग्न होऊन रहमान यांनी ड्रम्सची ‘डम-डम... डम-डम’ एवढीच धुन रेकॉर्ड करून ठेवली, जेणेकरून बोल तयार झाल्यावर गाणे तिथे बसवता येईल. इम्तियाज पुरते हवालदिल झाले होते. चित्रपट पणाला लागला होता आणि मुख्य गाणेच गायब होते.
ऑस्ट्रियातून आलेला एक संदेश
तशातच एक चमत्कार घडला! ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या इम्तियाज यांच्या सत्यार्थ नावाच्या मित्राने त्यांना भ्रमणध्वनीवर एक साधा संदेश पाठवला. मौलाना रूमी यांच्या पर्शियन कवितेचा तो इंग्रजी अनुवाद होता:
"The hunting falcon hears the sound of the drums... Come home, Come home!"
हे शब्द वाचताच इम्तियाज यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण चित्रपट जणू उभा राहिला. ते एकदम उद्गारले, "मला माझे गाणे मिळाले!"
रूमी यांची हीच संकल्पना आणि वेदना केंद्रस्थानी ठेवून गीतकार इरशाद कामिल यांनी अजरामर ओळी रचल्या— "ओ नादान परिंदे घर आजा..."
मनाचा ठाव घेणारे बोल
"क्यूँ देस-बिदेस फिरे मारा
क्यूँ हाल-बेहाल थका-हारा
तू रात-बिरात का बंजारा
ओ नादान परिंदे घर आजा...
कागा कागा रे मोरी इतनी अरज तोसे
चुन-चुन खाएयो मांस
अरजिया रे खाइयों ना तू नैना मोरे
पिया के मिलन की आस..."
एका इतिहासाची निर्मिती
ए. आर. रहमान यांचे रुहानी संगीत, मोहित चौहान यांचा मर्मस्पर्शी आवाज आणि रूमी यांच्या तत्त्वज्ञानातून जन्मलेले इरशाद कामिल यांचे शब्द एकत्र आले अन् 'नादान परिंदे'चा जन्म झाला. हे केवळ गाणे उरले नाही, तर 'रॉकस्टार'चा आत्मा बनले.
कला सीमा पलीकडची असते असे म्हणतात ते उगाच नाही. सुमारे ८०० वर्षांपूर्वी एका सूफी संताने लिहिलेल्या एका ओळीने आधुनिक भारतीय सिनेसृष्टीत संगीताचा एक नवा इतिहास लिहिला!