श्रीनगरमध्ये पार पडली राष्ट्रीय परिषद: 'काश्मीरियत', उर्दू आणि आंतरधर्मीय संवादावर मोठा भर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
श्रीनगरमधील राष्ट्रीय परिषदेत आंतरधर्मीय संवाद आणि काश्मीरियत विषयावर बोलताना नायब राज्यपाल मनोज सिन्हा
श्रीनगरमधील राष्ट्रीय परिषदेत आंतरधर्मीय संवाद आणि काश्मीरियत विषयावर बोलताना नायब राज्यपाल मनोज सिन्हा

 

आमिर सुहैल वानी

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर दिला. “काश्मीरची खरी ओळख ही त्याचा सामायिक सांस्कृतिक वारसा आहे. तसेच, विविध धर्मांच्या लोकांमध्ये शतकानुशतके चालत आलेली परस्पर सामंजस्य, आदर आणि सहअस्तित्वाची परंपरा हीच काश्मीरची खरी ओळख आहे.

काश्मीरने धार्मिक विविधतेला नेहमीच आपली ताकद मानले आहे”, असे ते म्हणाले. येथील संस्कृती सहिष्णुता, आध्यात्मिकता आणि मानवी सन्मानाच्या मूल्यांवर आधारित आहे. हा वारसा सुरक्षितपणे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपल्या सर्वांची सामायिक जबाबदारी आहे.

शनिवारी श्रीनगरमधील 'शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर'च्या विंटर हॉलमध्ये एका राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 'आंतरधर्मीय संवाद, उर्दू, काश्मीरियत आणि सामायिक सांस्कृतिक परंपरा' (Interfaith Dialogue, Urdu, Kashmiriyat, and Shared Cultural Traditions) हा या परिषदेचा मुख्य विषय होता. यावेळी उपराज्यपालांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, धर्मगुरू, लेखक, संशोधक, प्रशासक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

dd संवाद हे समाज मजबूत करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे, असे मनोज सिन्हा यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी विद्वान, विद्यापीठे, सामाजिक संस्था आणि नागरिक समाजाला एक मोठे आवाहन केले. विविध धार्मिक समुदायांमध्ये विश्वास आणि बंधुभाव मजबूत करण्यासाठी सर्वानी एकत्र काम करावे, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात वेद, भगवद्गीता, भक्ती संत आणि सुफी संतांच्या शिकवणीचा विशेष उल्लेख केला. सर्व आध्यात्मिक परंपरांचा मूळ संदेश प्रेम, करुणा आणि मानवता हाच आहे, असे ते म्हणाले.

“भारताची सांस्कृतिक ताकद त्याच्या विविधतेत दडलेली आहे. काश्मीर हे या विविधतेचे सर्वात सुंदर उदाहरण आहे”, असे त्यांनी सांगितले. “इथे अनेक शतकांपासून वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकमेकांचे सण, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा आदर करत आले आहेत. हीच 'काश्मीरियत'ची खरी भावना आहे.”

या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन अनेक संस्थांनी संयुक्तपणे केले होते. यात इंटर फेथ हार्मनी फाउंडेशन ऑफ इंडिया, शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी 'नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज' (NCPUL), टेंपल ऑफ अंडरस्टँडिंग इंडिया, दारा शिकोह सेंटर श्रीनगर आणि काश्मीर रायटर्स असोसिएशन यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात 'नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज'चे संचालक डॉ. मोहम्मद शम्स इक्बाल यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. “उर्दूने नेहमीच विविध संस्कृती आणि भाषांना स्वतःमध्ये सामावून घेतले आहे. उर्दू ही भारतीय सभ्यता आणि सामायिक संस्कृतीला जोडणारे एक अत्यंत मजबूत माध्यम आहे”, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी आणखी एक मोठी माहिती दिली. त्यांचे मंडळ हिंदी आणि संस्कृतच्या महत्त्वाच्या पुस्तकांचा उर्दूमध्ये अनुवाद करत आहे. यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, साहित्य आणि आध्यात्मिक परंपरा समाजातील मोठ्या वर्गापर्यंत पोहोचण्यास मदत मिळत आहे. त्यांच्या मते, भाषा हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे आणि संवाद हाच सामाजिक सलोख्याचा खरा पाया आहे.

ff 'इंटर फेथ हार्मनी फाउंडेशन ऑफ इंडिया'चे अध्यक्ष डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांनीही आपले विचार मांडले. त्यांची संस्था अनेक वर्षांपासून देशाच्या विविध भागांत धार्मिक सलोखा वाढवण्याचे काम करत आहे. “आता जम्मू-काश्मीरसारख्या भागावर विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे. कारण ही भूमी शतकानुशतके धार्मिक सहअस्तित्व, सांस्कृतिक बहुलता (प्लुरॅलिझम) आणि आध्यात्मिक समन्वयाचे (कोऑर्डिनेशनचे) मोठे उदाहरण राहिली आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी एक मोठा विश्वास व्यक्त केला. जर काश्मीरचा हा सामायिक वारसा पुन्हा मजबूत केला, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण देशातील सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेवर नक्कीच दिसून येईल. 'दारा शिकोह सेंटर श्रीनगर'च्या संस्थापक संचालक डॉ. ज्योत्स्ना सिंह यांनीही माहिती दिली. त्यांची संस्था काश्मीरची पारंपारिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच संवाद आणि बौद्धिक देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेत आहे.

दारा शिकोह यांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच प्रासंगिक असल्याचे त्या म्हणाल्या. विविध धार्मिक परंपरांमध्ये संवाद आणि सामंजस्य वाढवण्यासाठी त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या काळात अधिक महत्त्वाचा बनला आहे.

डॉ. ज्योत्स्ना सिंह यांनी युवा संशोधक आमिर सुहैल वानी यांच्या कार्याचेही कौतुक केले. “आंतरधर्मीय संवाद, तुलनात्मक धर्म, काश्मिरी आध्यात्मिक परंपरा आणि सामायिक सांस्कृतिक वारसा यावरील त्यांचे संशोधन समाजातील समज आणि विश्वास वाढवण्याच्या दिशेने एक मोठे योगदान आहे”, असे त्या म्हणाल्या.

काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर निलोफर खान यांनीही आपले विचार मांडले. “विद्यापीठ हे विचारांच्या देवाणघेवाणीचे मोठे व्यासपीठ आहे. असे कार्यक्रम विद्यार्थी आणि संशोधकांना विविध दृष्टिकोन समजून घेण्याची मोठी संधी देतात”, असे त्या म्हणाल्या.

त्यांनी एक मोठे आश्वासनही दिले. काश्मीर विद्यापीठ भविष्यातही अशा कार्यक्रमांना पूर्ण सहकार्य करेल. सामाजिक सलोखा, सांस्कृतिक संवर्धन आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर गंभीर शैक्षणिक चर्चा घडवून आणणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला विद्यापीठाचा पाठिंबा असेल.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, जम्मू आणि काश्मीरचे माजी 'सदर-ए-रियासत' आणि ज्येष्ठ राजकारणी डॉ. करण सिंह यांनीही मार्गदर्शन केले. “जगातील सर्व प्रमुख धर्म शेवटी करुणा, सत्य आणि सेवेचाच संदेश देतात. विविध संस्कृतींमधील संवाद हेच पूर्वग्रह आणि संघर्ष संपवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे”, असे ते म्हणाले.

त्यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील काही अनुभव सर्वांसोबत शेअर केले. जगातील विविध देशांमध्ये आंतरधर्मीय संवादाने अनेक कठीण प्रसंगांत विश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्या काही ओळी ऐकवत त्यांनी मोठा संदेश दिला. साहित्य आणि कवितेमध्ये समाजाला जोडण्याची एक अद्भुत क्षमता असते, असे ते म्हणाले.

उद्घाटन सत्रानंतर परिषदेचे तांत्रिक सत्र सुरू झाले. 'शेर-ए-काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी'चे कुलगुरू प्रोफेसर नजीर अहमद गनाई यांनी पहिल्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. यामध्ये डॉ. मोहम्मद मारूफ शाह, सरदार दलबीर सिंग सोधी, डॉ. गौतम कौल, प्रोफेसर रशीद मकबूल आणि डॉ. रफिया निसार यांनी आपले विचार मांडले.

दुसऱ्या तांत्रिक सत्राचे अध्यक्षपद काश्मीर विद्यापीठाचे कुलसचिव प्रोफेसर नसीर इक्बाल यांनी भूषवले. यामध्ये प्रोफेसर सतीश विमल, प्रोफेसर इरफान अहमद मलिक, प्रोफेसर अल्ताफ अंजुम, प्रोफेसर एजाज मोहम्मद शेख, डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद आणि डॉ. मोहम्मद शम्स इक्बाल यांनी विविध विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले.

'काश्मीरियत' ही केवळ एक सांस्कृतिक संकल्पना (कन्सेप्ट) नाहीये, तर तो एक जगण्याचा मार्ग आहे. यामध्ये धार्मिक सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामायिक वारसा यांचा समावेश होतो. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण, साहित्य, संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मजबूत करण्यावर सर्व वक्त्यांनी मोठा भर दिला.

परिषदेच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला. काश्मीरच्या सभ्यतेची ओळख विभाजनावर नाही, तर संवादावर आधारित आहे. येथील सामायिक संस्कृती आजही देशासाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे. जर संवाद, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची परंपरा पुढे नेली, तर सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करता येईल, असे वक्त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, असे कार्यक्रम समाजात विश्वास, बंधुभाव आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाची भूमिका बजावतात. श्रीनगरमध्ये आयोजित केलेली ही परिषद याच विचाराचे एक सशक्त उदाहरण म्हणून सर्वांसमोर आली आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter