पुणे
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमाला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भीमराव कांबळे (वय ६५) असे या दोषीचे नाव असून, या प्रकरणाचा निकाल अवघ्या ५५ दिवसांत लागला आहे. न्यायालयाने या गुन्ह्याला 'दुर्मिळात दुर्मिळ' (Rarest of Rare) घटना मानत कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली आहे.
१ मे २०२६ रोजी ही घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास करत १६ मे रोजी म्हणजेच अवघ्या १६ दिवसांत १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर विशेष न्यायालयामध्ये ५५ साक्षीदार तपासले गेले. अत्यंत कमी कालावधीत न्यायप्रक्रिया पूर्ण करत न्यायालयाने दिलेला हा निकाल कायद्याचा धाक निर्माण करणारा ठरला आहे.
निकाल वाचताना विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीच्या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. आरोपीने तीन वर्षांच्या असहाय्य मुलीवर केलेल्या अत्याचाराचे स्वरूप अत्यंत अमानुष होते. त्याने केवळ मुलीची हत्या केली नाही, तर मृत्यूनंतरही तिचे विटंबना केली. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता त्याला माफी मिळण्याचा कोणताही अधिकार नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला असून, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला आहे.