मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह दिल्लीने स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये (Playoffs) पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. केएल राहुल आणि अभिषेक पोरल यांच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे दिल्लीने १९४ धावांचे लक्ष्य सहज पार केले.
राजस्थानच्या डावाची पडझड
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १४ षटकांत २ बाद १६० अशी मजबूत मजल मारली होती. मात्र, त्यानंतर मिचेल स्टार्कने सामन्याचे चित्र पालटले. त्याने ४० धावांत ४ बळी घेत राजस्थानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. राजस्थानने शेवटच्या षटकांमध्ये केवळ ३३ धावांत ६ गडी गमावले आणि त्यांचा डाव ८ बाद १९३ धावांवर रोखला गेला. राजस्थानकडून ध्रुव जुरेलने ५३ आणि रियान परागने ५१ धावांची खेळी केली, तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ४६ धावांचे योगदान दिले.
राहुल आणि पोरलची शतकी भागीदारी
दिल्ली कॅपिटल्सने लक्ष्याचा पाठलाग करताना अत्यंत आश्वासक सुरुवात केली. केएल राहुल (४२ चेंडूंत ५६ धावा) आणि अभिषेक पोरल (३१ चेंडूंत ५१ धावा) यांनी केवळ १०.१ षटकांत १०५ धावांची सलामी दिली. पोरलने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत सात चौकार आणि एक षटकार लगावला, तर राहुलने संयमी खेळी करत डाव सावरला. दासून शनाकाने राहुलला बाद करत ही जोडी फोडली.
अक्षर आणि आशुतोषचा विजयी शेवट
अखेरच्या षटकांमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांनी काही बळी मिळवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्णधार अक्षर पटेलने १८ चेंडूंत नाबाद ३४ धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. शेवटी आशुतोष शर्माने अवघ्या ५ चेंडूंत नाबाद १८ धावा ठोकत १९.२ षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणारा साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्लीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे.