मकाऊ येथे सुरू असलेल्या ११ व्या सांडा विश्वचषकात भारतीय वुशू खेळाडू अपर्णाने महिलांच्या ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत व्हिएतनामच्या विद्यमान जगज्जेत्या खेळाडूचा पराभव करत ही चमकदार कामगिरी केली.
भारतीय वुशू असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, १२ मे पासून सुरू झालेल्या या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. अंतिम सामन्यात अपर्णाने व्हिएतनामच्या थी फुओंग न्गा न्गो हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक वुशू चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अपर्णाला याच खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला होता. आता विश्वचषकात तिलाच हरवून अपर्णाने त्या पराभवाचा बदला घेतला आहे.
स्पर्धात्मक वुशू खेळ प्रामुख्याने ताओलू (Taolu) आणि सांडा (Sanda) या दोन मुख्य प्रकारांमध्ये विभागला जातो. ताओलू हा जिम्नॅस्टिक्स आणि मार्शल आर्ट्सचा संगम आहे, ज्यामध्ये खेळाडूंच्या शारीरिक हालचाली, जंप्स, स्वीप्स आणि बॅलन्स यावर गुण दिले जातात. तर, सांडा हा पारंपरिक वुशू तंत्रातून विकसित झालेला आधुनिक लढाऊ खेळ आहे. यामध्ये प्रामुख्याने पंचिंग, किकिंग, थ्रोइंग, कुस्ती आणि बचावात्मक तंत्रांचा वापर केला जातो.