Virat Kohli ने रचला इतिहास! IPL मध्ये ठरला सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
विराट कोहली
विराट कोहली

 

भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीने आयपीएलमध्ये पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर निर्माण झालेल्या दडपणावर मात करत विराटने बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ६० चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. या झंझावाती शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ६ गड्यांनी विजय मिळवत आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे.

सामन्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारताना विराटने आपल्या मनातील भीती मोकळेपणाने बोलून दाखवली. तो म्हणाला की, "गेल्या दोन सामन्यांत मला धावा करता आल्या नव्हत्या, ही गोष्ट मला आतून खात होती. मला माहित होते की मी चेंडू नीट मारत आहे, पण जेव्हा तुम्ही संघासाठी अपेक्षित प्रभाव पाडू शकत नाही, तेव्हा त्याचे दडपण येते."

३७ वर्षीय विराटने या सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. हे त्याचे आयपीएलमधील ९ वे शतक असून त्याने महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माला मागे टाकत या स्पर्धेत सर्वाधिक २७९ सामने खेळणारा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. दडपणाबद्दल बोलताना तो म्हणाला, "लोक म्हणतात की प्रेशर हा एक विशेषाधिकार आहे, कारण ते तुम्हाला नम्र ठेवते. एखाद-दुसरा सामना खराब गेला की निर्माण होणारी अस्वस्थता तुम्हाला खेळ सुधारण्यास मदत करते. ते अपयशच तुम्हाला पुन्हा फिनिक्ससारखे भरारी घेण्यास प्रवृत्त करते."

विक्रमी कामगिरी 
विराटने या खेळीत कोणतेही अतरंगी फटके न मारता आपल्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित केले. "मी फक्त क्रीजवर माझ्या पोझिशनवर लक्ष दिले आणि चेंडूचा टप्पा ओळखून गॅप शोधले. या स्तरावर सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. एक दिवस हा खेळ संपणार आहे, त्यामुळे तोपर्यंत मी माझे सर्वस्व मैदानात ओतणार आहे," असे भावनिक उद्गार त्याने काढले.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारनेही या विजयावर समाधान व्यक्त केले आहे. गुजरात टायटन्सला मागे टाकत १६ गुणांसह आरसीबी आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. केकेआरला १९२ धावांवर रोखणे हे संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रतीक असल्याचे पाटीदारने नमूद केले.