आवाज द व्हॉइस मराठी ब्युरो, पुणे : १८ मे
जगभरात पसरलेल्या 'तब्लीग जमात' या इस्लामिक धर्म सुधारणावादी चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे 'आमीर' (प्रमुख) हाफिज मंजूर साहेब यांचे सोमवारी पुण्यात दुःखद निधन झाले. ते नव्वदीत होते.
प्रसिद्धी आणि कोणत्याही बडेजावपणापासून दूर राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक सुधारणा आणि सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.
हाफिज मंजूर साहेब जीवनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत धर्मकार्यात अत्यंत सक्रिय होते. रविवारी रात्रीच ते पुण्यात आले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी पहाटेची तहज्जुद आणि फजरची नमाज अदा केली.
फजरच्या नमाजनंतर त्यांना मस्जिदमध्ये अचानक चक्कर आली. उपचारासाठी त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते दर सोमवारी आणि गुरुवारी नियमितपणे रोजा (उपवास) ठेवत असत. आज मृत्यूसमयीही ते रोजाच्याच अवस्थेत होते, अशी माहिती त्यांच्या अनुयायांनी दिली.
पुण्यातील फातिमा मस्जिद हे त्यांच्या कार्याचे केंद्र होते. त्यांनी अनेक दशके धर्माची आणि समाजाची सेवा केली. तरुण वर्गाला व्यसनापासून दूर ठेवणे आणि समाजात हुंडाविरोधी प्रबोधन करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर मोठी मेहनत घेतली.
विवाहासारखे कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व्हावेत, यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यांच्या निधनामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले असून अनेकांनी आपला मार्गदर्शक गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे आमीर हजरत हाफिज मंजूर साहेब यांचे निधन हे संपूर्ण उम्मतसाठी (मुस्लिम समाजासाठी) एक खूप मोठे नुकसान असल्याची भावना अनुयायांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दीनची (धर्माची) खिदमत, समाजाचे भले आणि मानवतेच्या सेवेसाठी व्यतीत केले.
हजरत यांनी तरुणांना नेहमीच चांगले शिक्षण, उत्तम अखलाक (संस्कार) आणि सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची मेहनत, साधेपणा, उम्मतची असलेली काळजी आणि लोकांना जोडण्याची त्यांची हातोटी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील.
आज आपल्यात त्यांचे शारीरिक अस्तित्व नसले, तरी त्यांनी केलेली सत्कार्ये, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेली शिकवण कायम जिवंत राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
भारतातील तब्लीग जमातचे प्रमुख मौलाना साद यांनी एका ऑडिओ संदेशाद्वारे हाफिज मंजूर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मौलाना साद यांनी हाफिज मंजूर यांना 'एक महान मुजाहिद (योद्धा), अत्यंत मेहनती आणि मोठी कुर्बानी देणारे व्यक्तिमत्त्व' म्हटले आहे.
सर्व अनुयायांना त्यांच्यासाठी 'इसाले सवाब' (पुण्य अर्पण करणे) करण्याचे आणि आपल्या धार्मिक प्रवासात त्यांच्या पुण्याची नियत करण्याचे आवाहन मौलाना साद यांनी केले आहे.
एका अनुयायाने आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, वयाच्या ९५ व्या वर्षीही ते धर्माच्या कामात एका तरुण योद्ध्यासारखे सक्रिय होते.
हाफिज मंजूर साहेब यांचा दफनविधी आज, १८ मे रोजी रात्री १० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील दफनभूमीत होणार आहे.
तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी फातिमा मस्जिदमध्ये ठेवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मानणारे लाखो अनुयायी या अंत्यविधीसाठी पुण्यात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनान आणि पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
तब्लीग जमात ही एक जागतिक सुन्नी इस्लामिक धार्मिक सुधारणावादी आणि आध्यात्मिक चळवळ आहे. या चळवळीची सुरुवात १९२६ मध्ये मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी भारतातील मेवात भागात केली होती.
मुस्लिमांना त्यांच्या मूळ धार्मिक मूल्यांकडे आणि शिकवणीकडे परत आणणे, हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. नियमित नमाज पठण करणे आणि साधे जीवन जगणे यावर त्यांचा भर असतो.
हा लेखही वाचा : सच्चा मुसलमान बेकायदेशीर आणि देशविरोधी कृत्ये करूच शकत नाही - तब्लीग प्रमुख
तब्लीग जमात राजकारण, सामाजिक वाद आणि प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर राहते. याचे सदस्य ठराविक दिवसांचा वेळ काढून गावोगावी प्रवास करतात आणि इतर मुस्लिम बांधवांना धर्माच्या मार्गावर चालण्याची आठवण करून देतात.
या चळवळीत मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रमुख असतो. या प्रमुखाला 'आमीर' म्हटले जाते. हाफिज मंजूर हे याच तब्लीग जमातचे महाराष्ट्र राज्याचे आमीर होते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter