मुज्तबा खामेनींचा संदेश : राष्ट्रवादाचे नवे उदाहरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
मुज्तबा खामेनी
मुज्तबा खामेनी

 

मलिक असगर हाशमी

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सलग १११ दिवस भयंकर संघर्ष चालला. त्यानंतर अखेर त्यांच्यात करार झाला आहे. सध्या जगभरात या कराराच्या फायद्या-तोट्यांचं विश्लेषण सुरू आहे. या प्रदीर्घ आणि विनाशकारी युद्धातून कुणाला नेमकं काय मिळालं, हे समजून घेण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. याच दरम्यान इराणचे विद्यमान सर्वोच्च नेते मुज्तबा अली खामेनी यांनी आपल्या राष्ट्राला उद्देशून विशेष संदेश जारी केला आहे. 

जगभरातील मोठे रणनीतीकार आता हा संदेश डिकोड करण्याचा आणि त्याचे सखोल अर्थ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या दृष्टिक्षेपात मुज्तबा खामेनी यांच्या या संदेशातून सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अर्थ निघतो. त्यांच्यासाठी त्यांचा देश आणि देशातील जनता सर्वात महत्त्वाची आहे. "या क्षणापासून आपण-म्हणजेच तुम्ही, आपला गौरवशाली देश आणि हा नम्र सेवक या अटी पूर्ण होण्याची वाट पाहू," असं त्यांनी आपल्या अधिकृत संदेशात लिहिलं आहे.

मुज्तबा खामेनी यांच्या या पत्रातून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या शासनाचा मुख्य पाया राष्ट्रवाद हाच आहे. देशाप्रती असलेले हे समर्पण जगामध्ये चर्चेचा विषय बनलं आहे. पतंजलीचे सर्वेसर्वा बाबा रामदेव यांनीही आपल्या अलीकडच्या पॉडकास्टमध्ये इराण आणि तिथल्या नागरिकांचं कौतुक केलं आहे. 

इराणी लोकांच्या त्यांच्या देशावर असलेल्या उत्कट प्रेमाचा त्यांनी विशेष उल्लेख केला आहे. कठीण परिस्थितीत आपल्या देशावर अतूट आणि अथांग प्रेम कसं करावं, हे आपण किंवा जगातील कोणत्याही देशाने इराणकडून शिकलं पाहिजे. हीच खरी गोष्ट आहे.

संकटाच्या काळात एकजुटीचं महत्त्व
आपल्या देशात छोटीशी अडचण आली, तरी आपण लगेच अस्वस्थ होतो. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यावर जगभरात स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोलची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक देशांमधील लोक त्रस्त झाले होते. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आणि पूर्ण सत्य न जाणून घेताच लोक रस्त्यावर उतरले होते. 

विरोधी पक्षांच्या राजकीय भूलथापांना बळी पडून लोकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची विधानं लिहायला सुरुवात केली होती. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. संकटाच्या काळात अनेक देश अंतर्गत पातळीवरही एकजूट राहू शकले नाहीत. अशा समाजांना इराणच्या नागरिकांकडून खूप काही शिकण्याची गरज आहे.

अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तेव्हा त्यांचा हेतू खूप वेगळा होता. इराणच्या मोठ्या नेत्यांना आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मारल्यानंतर तिथली जनता बंड करेल, असा अमेरिकन रणनीतीकारांचा समज होता. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरतील, असं त्यांना वाटलं होतं. पण इराणच्या जनतेने देशांतर्गत राजकारणाऐवजी राष्ट्रवादाची निवड केली. एवढ्या मोठ्या संकटातही ते थोडेदेखील विचलित झाले नाहीत. 

दीर्घकाळ सर्व प्रकारच्या आर्थिक निर्बंधांचा सामना करत असतानाही इराणी नागरिक ठाम उभे राहिले. आर्थिक निर्बंधांमुळे इराणी चलन डॉलरच्या तुलनेत पूर्णपणे घसरलं होतं. असं असूनही, तिथली जनता आपल्या देशाच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

युद्धाच्या मैदानातून आलेली राष्ट्रवादाची जिवंत उदाहरणं
या भयंकर युद्धादरम्यान इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर जोरदार बॉम्बफेक केली होती. हजारो टन दारूगोळा इराणच्या भूमीवर टाकण्यात आला होता. तरीही तिथल्या लोकांचं मनोबल खचलं नाही. अमेरिकेने पार शाळेवर बॉम्ब टाकून तिथ शिकणाऱ्या दीडशेहून अधिक मुलींना मारलं होतं. या भयंकर दुर्घटनेनंतरही इराणी लोकांनी आपली डिप्लोमॅटिक ताकद दाखवली. 

इराणी अधिकारी शांतता करारासाठी इस्लामाबादला गेले, तेव्हा ते बॉम्बस्फोटात मारल्या गेलेल्या त्या निष्पाप मुलींना विसरले नव्हते. 'सॉफ्ट डिप्लोमसी'चा भाग म्हणून त्यांनी त्या मुलींच्या स्कूल बॅग्स प्रतीकासारख्या विमानातून आपल्यासोबत नेल्या. याशिवाय इराणी फुटबॉल संघानेही फिफाच्या मंचावर त्या मुलांना श्रद्धांजली वाहून जगाला मोठा संदेश दिला. खऱ्या अर्थाने यालाच एखाद्या देशाची 'सॉफ्ट डिप्लोमसी' म्हटलं जातं.

रणनीतिकदृष्ट्या ही आणखी मोठी शिकवण देणारी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक आणि विनाश होत असतानाही इराणमधील शाळांमध्ये शिक्षण सुरूच होतं. देशातील जीवन थांबलं नव्हतं. युद्धाच्या मैदानातून अशीही काही दृश्यं समोर आली. तिथे इराणी सैनिक शत्रूवर क्षेपणास्त्रं डागत असताना अतिशय शांतपणे कॉफी पीत होते आणि सोशल मीडियासाठी रील्स बनवत होते. 

संकटाच्या सर्वोच्च टप्प्यावरही त्यांचं मनोबल किती उंचावलेलं होतं, हे यातून दिसून येतं. अमेरिकन लढाऊ विमानाचा इराणच्या सीमेत अपघात झाला, तेव्हा तर हद्दच झाली. त्या कोसळलेल्या विमानातील सैनिकाला वाचवण्यासाठी शत्रू देशाचे सशस्त्र सैनिक इराणच्या निवासी भागात घुसले. तेव्हा तिथले सामान्य आणि निशस्त्र लोक थेट त्यांच्याशी भिडले. कोणत्याही शस्त्रांशिवाय लढला जाणारा हा असा राष्ट्रवाद आहे. तो केवळ देशप्रेमातूनच निर्माण होतो.

नेत्यांचं वर्तन आणि जनतेचा विश्वास
या संपूर्ण संकटाच्या काळात इराणच्या वरिष्ठ नेत्यांचं वर्तनही पाहण्यासारखं होतं. युद्धाच्या त्या कठीण दिवसांमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री पेझेशकियन सामान्य माणसाप्रमाणे साध्या हॉटेल्समध्ये जेवताना दिसले. डॉक्टरच्या भूमिकेत रुग्णालयात रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना ते व्हिडिओमध्ये दिसले. 

देशावर बॉम्बफेक होत असताना सरकारचे प्रतिनिधी थेट जमिनीवर आणि सामान्य लोकांमध्ये अशा प्रकारे सक्रिय असतात. हे जगात खूप कमी वेळा पाहायला मिळते. यामुळेच देश वाचवण्याची वेळ आली, तेव्हा लाखो निशस्त्र लोक केवळ आपली एकजूट दाखवण्यासाठी रस्त्यावर उतरले.

याच अतूट विश्वासाच्या जोरावर इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी आपल्या देशवासीयांना संबोधित करताना म्हणतात, "भविष्यात होणाऱ्या समोरासमोरच्या चर्चेचा अर्थ शत्रूची भूमिका स्वीकारणे असा अजिबात होणार नाही, हे पूर्णपणे स्पष्ट आहे. आमच्या इमामच्या प्रार्थना इराणच्या सन्माननीय राष्ट्रासाठी सर्व प्रकारचे विजय आणि यश नक्कीच घेऊन येतील, अशी आम्हाला पूर्ण आशा आहे." एवढ्या सखोल विश्वासाने देशाचा तोच नेता लिहू शकतो. संकटाच्या प्रत्येक क्षणी त्याच्या देशाची जनता त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हे त्याला पक्कं माहीत असतं.

प्रादेशिक संतुलन आणि इस्रायलचं संकट
या युद्धादरम्यान आणखी एक रंजक पैलू पाहायला मिळाला. इराण प्रत्युत्तर देत यूएई, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियामधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रं आणि ड्रोन डागत होता. तेव्हा त्या देशांच्या सरकारांनी आपल्या नागरिकांना घरातच राहण्याचा कडक संदेश दिला होता. 

दुसरीकडे इस्रायलमधील परिस्थिती अशी होती. इराणच्या जोरदार बॉम्बफेकीच्या वेळी तिथले सामान्य लोक बंकर्समध्ये लपून बसले होते. इराणच्या या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलचं खूप मोठं नुकसान झालं आहे.

आता अमेरिका आणि इराण यांच्यात जो करार झाला आहे. त्यामुळे इस्रायलचं रणनीतिकदृष्ट्या नुकसानच झालं आहे. या करारानंतर इस्रायलमध्येच तिथल्या विद्यमान नेतन्याहू सरकारला मोठा विरोध सुरू झाला आहे. या करारामुळे आपल्याला मोठं लष्करी आणि रणनीतिक नुकसान सहन करावं लागेल, हे इस्रायलचे मोठे लष्करी तज्ज्ञ स्पष्टपणे मान्य करत आहेत. 

एवढंच नाही तर, आगामी निवडणुकीत बेंजामिन नेतन्याहू यांची सत्ता पूर्णपणे धोक्यात येऊ शकते, असा अंदाजही राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. या संकटाच्या काळात एकमेकांवर आरोप करण्याऐवजी राष्ट्रीय एकजूट दाखवण्याची गरज असते (जशी इराणने दाखवली आहे). हे इस्रायलच्या लोकांना सध्या समजत नाहीये.

करारामागील डिप्लोमसी आणि भविष्य
तमाम प्रकारच्या संकटांचा सामना करूनही इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनी यांनी आपल्या देशाला अत्यंत संतुलित संदेश दिला आहे. त्यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केलं आहे, "तुम्हाला आधीच सूचित केल्याप्रमाणे, इराण आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. 

या टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत, जबाबदार अधिकाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सद्भावनेने प्रयत्न केले आहेत." अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच हताश होऊन हा करार पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे दबाव आणि मार्ग वापरले होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

या कराराबाबत आपलं स्वतःचं मत थोडं वेगळं होतं, हे स्वीकारण्यासही मुज्तबा खामेनी यांनी अजिबात संकोच केला नाही. असे असूनही, देशाचे सन्माननीय राष्ट्राध्यक्ष (हे 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदे'चे प्रमुख आहेत) यांनी इराणी राष्ट्र आणि 'रेझिस्टन्स फ्रंट'च्या (प्रतिरोध आघाडीच्या) अधिकारांचं रक्षण करण्याचं वचन दिलं होतं. त्याचा विचार करून खामेनी यांनी आपली परवानगी दिली. 

भविष्यात अमेरिकेने कोणत्याही अवाजवी आणि चुकीच्या मागण्या केल्या, तर इराण त्यांच्यासमोर कधीही झुकणार नाही, अशी जबाबदारी राष्ट्राध्यक्षांनी स्पष्टपणे घेतली होती. आपल्या देशातील जनतेसमोर इतक्या पारदर्शकतेने आणि धाडसाने संदेश देण्यासाठी महान नेतृत्वाची आणि अदम्य साहसाची गरज असते. हेच या संपूर्ण १११ दिवसांच्या संघर्षाचं सर्वात मोठं राजकीय आणि सामाजिक फलित आहे.

(लेखक 'आवाज-द व्हॉइस' हिंदीचे संपादक आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter