MUMBAI MONSOON: अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले, लोकल वाहतुकीचा वेग मंदावला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
मुंबईच्या पावसात मुंबईकर
मुंबईच्या पावसात मुंबईकर

 

मुंबई 

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहराच्या अनेक भागांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अँधेरी सबवेसह काही सखल भागांत पाणी साचल्याने प्रशासनाला वाहतुकीत बदल करावा लागला.

लोकल रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेवरही पावसाचा परिणाम दिसून आला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या काहीशा विलंबाने धावत आहेत. हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र त्यानंतर ती पुन्हा सुरळीत करण्यात आली. बेस्ट बसेस मात्र नेहमीप्रमाणे आपल्या वेळेत धावत आहेत.

पावसाची आकडेवारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार, मंगळवार सकाळी ८ ते बुधवार सकाळी ८ या कालावधीत पूर्व उपनगरांमध्ये सरासरी १०९ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये ८७ मिमी आणि शहर भागात ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मानखुर्द भागात सर्वाधिक १७०.४ मिमी पावसाची नोंद झाली, तर भायखळा (१६२.५ मिमी), मुंबई सेंट्रल (१४२.४ मिमी), वांद्रे-कुर्ला संकुल (१३२.४ मिमी) आणि बोरिवली (१२६ मिमी) परिसरातही जोरदार पाऊस झाला.

बुधवारी सकाळी ७ ते ८ या एका तासाच्या कालावधीत अँधेरी पश्चिम भागात ३९ मिमी पावसाची नोंद झाली. सखल भागात पाणी साचल्याच्या तक्रारीनंतर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य ती पावले उचलली असून वाहतूक वळवण्यात आली आहे.