तेहरान
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेष्कीयन यांनी भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोक-ते-लोक पातळीवरील संबंध हा एक 'मूल्यवान ठेवा' असल्याचे त्यांनी म्हटले असून, भविष्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याची इराणची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतींच्या अधिकृत संकेतस्थळावरून जारी केलेल्या संदेशात, इराण आणि भारत यांच्यातील समान हितसंबंधांच्या आधारे संबंधांना नवी दिशा देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. परस्पर विश्वास आणि सन्मानावर आधारित सर्वसमावेशक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या सामायिक हितांचे रक्षण करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यास इराण तयार असल्याचे पेजेष्कीयन यांनी नमूद केले. तसेच भारताच्या प्रगती, समृद्धी आणि जनतेच्या निरंतर आनंदासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.