नवी दिल्ली
अफगाणिस्तानची महिला सायकलपटू फरिबा हाशिमी हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. महिलांच्या सायकलिंग रोड रेस प्रकारात रौप्यपदक पटकावत तिने अफगाणिस्तानसाठी या स्पर्धेत पहिलेच पदक जिंकले आहे. २००२ नंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणारी ती अफगाणिस्तानची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
नागोया येथे पार पडलेल्या या स्पर्धेत २ तास ५० मिनिटांत शर्यत पूर्ण करत फरिबाने हे यश मिळवले. मात्र, हा प्रवास तिच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. तालिबानने सत्तेवर ताबा मिळवल्यानंतर २०२१ मध्ये तिला देश सोडावा लागला होता. सध्या ती इटलीमध्ये राहून सराव करत आहे.
फरिबाने लहानपणी सायकल चालवायला सुरुवात केली तेव्हा समाजाच्या भीतीने तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. महिलांना सायकल चालवण्याची परवानगी नसलेल्या संस्कृतीत तिने पुरुषांचे कपडे घालून आणि रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने सराव केला. या काळात तिच्यावर दगडफेक करण्यात आली, अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तिच्या वडिलांनी तिच्या पाठीशी उभे राहत तिला स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा दिली.
इटलीत गेल्यानंतर माजी विश्वविजेती अलेस्ड्रा कॅपेलोत्तो हिने तिला मदत केली आणि तिची व्यावसायिक कारकीर्द सुरू झाली. पॅरिस ऑलिम्पिकनंतर आता आशियाई क्रीडा स्पर्धेतील या पदकाने तिचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे. फरिबाचे लक्ष आता आगामी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर असून, अफगाणिस्तानच्या इतर मुलींसाठीही मार्ग सुकर व्हावा, अशी तिची इच्छा आहे.