ओनिका माहेश्वरी
जम्मू-काश्मीरमधील डोडा गावचा रहिवासी असलेला हमझा शेख हा त्या माणसांपैकी एक आहे ज्याने लोकांचे प्राण वाचवणे अन् गायब झालेल्यांचे मृतदेह शोधणे हेच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले आहे. २८-२९ वर्षांचा हमझा गेल्या अनेक वर्षांपासून चिनाब आणि जम्मू-काश्मीरमधील इतर नद्यांमध्ये बचाव कार्यात गुंतलेला आहे. यामुळेच त्याला जम्मू-काश्मीरचा 'रेस्क्यू मॅन' म्हणून ओळखले जाते.
त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही नद्यांमध्ये उतरण्याची त्याची तयारी. पाण्याचा प्रवाह वेगवान, नदी खोल अन् पाणी गोठवणारे थंड असते. पण अपघाताची बातमी मिळताच हमझा क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो.
चिनाब नदीतील अपघात
जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागातून वाहणाऱ्या नद्या जितक्या सुंदर दिसतात, तितक्याच त्या भयंकर धोक्याने भरलेल्या आहेत. चिनाब अन् खोऱ्यातील इतर नद्यांच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने अनेक अपघात घडतात. एकदा का कुणी या पुरात वाहून गेले की त्याला शोधणे हे सर्वात मोठे आव्हान असते.
दुर्गम भागात खोल पाण्यात उतरणारे व्यावसायिक डायव्हर्स सहज उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी दुसऱ्या राज्यांतून खाजगी डायव्हर्सना बोलावले जाते. हे खाजगी डायव्हर्स एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी तब्बल २ ते अडीच लाख रुपये मागतात. श्रीमंत कुटुंबे हे पैसे कसेबसे उभे करतात, पण गरीब कुटुंबांना एवढी मोठी रक्कम जुळवणे अशक्य होते. त्यामुळे आपल्या माणसाच्या आशेने अनेक कुटुंबे नदीकाठी तासन् तास, दिवसेंदिवस वाट पाहत बसतात.
हमझा या हताश कुटुंबांचे दुःख अगदी जवळून पाहत आला आहे. म्हणूनच त्याने या कामाला कधीच कमाईचे साधन बनवले नाही. गरजू कुटुंबांना ही सेवा पूर्णपणे मोफत देण्याचा निर्धार त्याने केला आहे.
लहानपणीच्या दुर्दैवी घटनेने बदलले आयुष्य
हमझाचे नद्यांशी नाते लहानपणापासूनचे. त्याचे घरच नदीकाठी होते, त्यामुळे पाण्याचा खळखळाट त्याच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होता. पण तो १० वर्षांचा असताना एका दुर्दैवी घटनेने त्याचे आयुष्य कायमचे बदलून टाकले.
त्याच्या चुलत भावाला चिनाब नदीच्या जोरदार प्रवाहाने वाहून नेले. त्याला शोधण्यासाठी कुटुंबाने अथांग प्रयत्न केले. सलग २-३ वर्षे त्याचे कुटुंबीय चिनाबच्या किनाऱ्यावर त्याला शोधत राहिले, पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही.
आपले मूल गमावण्याचे दुःख अन् त्याचा मृतदेहही न मिळण्याची तडफ हमझाने खूप जवळून अनुभवली. हीच वेदना पुढे त्याच्या आयुष्याचे ध्येय बनली. जेव्हा जेव्हा कुणी नदीत वाहून जायचे, तेव्हा त्याला स्वतःच्या लहानपणीची ती भयंकर घटना आठवायची.
त्याचे कुटुंब नदीतून वाळू काढण्याचे कष्ट करायचे. लहानपणापासून पाण्यात उतरणे अन् वाळूची जड पोती उचलल्यामुळे त्याची पोहण्याची अन् पाण्यात दम धरण्याची क्षमता प्रचंड वाढली.
अवघ्या ११ वर्षांचा असताना त्याने नदीत एक बेवारस मृतदेह पाहिला. त्या प्रसंगाने त्याच्या मनावर खोल परिणाम केला. हा कुणाचा तरी मुलगा, कुणाचा तरी भाऊ असेल; जर हा मृतदेह त्याच्या कुटुंबाला मिळाला तर त्यांना अंतिम संस्कार तरी करता येतील, असा विचार करून त्याने तो मृतदेह बाहेर काढला. तिथूनच त्याच्या या अनोख्या प्रवासाची सुरुवात झाली.
कोणत्याही उपकरणांशिवाय ५० फूट खोल डुबकी
आधुनिक स्कुबा उपकरणे किंवा ऑक्सिजन सिलेंडरशिवाय हमझाने स्वतःला खोल पाण्यात पोहण्यासाठी तयार केले आहे. कोणतीही साधने नसताना त्याने ५० फूट खोल पाण्यात फ्री डायव्हिंग केले आहे.
अनेक रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये त्याला सलग कित्येक दिवस शोधाशोध करावी लागते. काही प्रसंगांत तो सलग १३-१३ दिवस एकाच मोहिमेवर तैनात राहिला आहे. डोडा अन् चिनाब खोऱ्यात तो गेल्या १५-१६ वर्षांपासून ही सेवा देतोय. दीर्घकाळ त्याचे हे काम स्थानिक भागापुरतेच मर्यादित होते अन् फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती होती.
काश्मीर खोऱ्यात मिळाली खरी ओळख
सुमारे आठ महिन्यांपूर्वी हमझा चिनाब खोऱ्यातून काश्मीर खोऱ्यात आला. त्यावेळी खोऱ्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली होती अन् अनेक ठिकाणांहून अपघातांच्या बातम्या येत होत्या. हमझाने कोणत्याही औपचारिक हाकेची वाट पाहिली नाही. जिथे गरज वाटली, तिथे तो मदतीसाठी थेट पाण्यात उतरला.
काश्मीरमधील लोकांनी जेव्हा त्याला बर्फाळ अन् वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचवताना पाहिले, तेव्हा त्याच्या कामाचा डंका वाजला. त्याला खऱ्या अर्थाने 'रेस्क्यू मॅन' ही ओळख मिळाली. स्वतःच्या भागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हमझाला काश्मीरमध्ये मिळालेल्या प्रेमाने आणि आदराने नवीन ऊर्जा दिली.
कामाचा एक रुपयाही न घेणारा अवलिया
हमझाच्या या मोहिमेची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तो या कामासाठी कधीच पैसे घेत नाही. कुटुंबातील कुणी पाण्यात बुडाल्यावर खाजगी डायव्हर्सची फी गरीब कुटुंबांचे कंबरडे मोडते.
हे अनुभव पाहिल्यामुळे गरजू कुटुंबांनी पैशांचा विचार न करता आपल्याला कधीही हाक मारावी, हा निर्णय त्याने घेतला. या कामाला तो व्यवसाय मानत नसून स्वतःची भावनिक जबाबदारी मानतो.
अंगात ताकद असेपर्यंत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी नद्यांमध्ये उतरत राहीन, असे तो ठामपणे सांगतो. त्याच्यासाठी रेस्क्यू म्हणजे फक्त मृतदेह बाहेर काढणे नव्हे, तर एका पूर्ण कुटुंबाची तुटलेली आशा पुन्हा सांधणे असते.
मृत्यूची भीती अन् अल्लाहावरील श्रद्धा
उफाळलेल्या नदीत उतरणे म्हणजे थेट मृत्यूशी सामना करणे! मृत्यूच्या भीतीबद्दल विचारले असता हमझा आपल्या धार्मिक श्रद्धेचा उल्लेख करतो. मानवतेची सेवा करताना मृत्यू आला, तर माणूस आपल्या चांगल्या कर्मांसोबत अल्लाहाच्या दरबारात उभा राहील, असा त्याचा ठाम विश्वास आहे. प्रसिद्धी किंवा पैशासाठी नाही, तर केवळ चांगल्या हेतूने तो हे काम करतो. हीच निष्ठा त्याला धोकादायक पाण्यात उतरण्याचे धाडस देते.
सुरुवातीला हमझाच्या आईला त्याच्या या कामाची खूप भीती वाटायची. कोणत्या आईला आपल्या मुलाला पुराच्या पाण्यात उतरताना पाहणे सोपे असणार? पण हळूहळू तिचा दृष्टिकोन बदलला. सोशल मीडियावर हमझाच्या रेस्क्यू ऑपरेशन्सचे व्हिडिओ आले. लोकांनी त्याला दिलेले प्रेम अन् सन्मान आईने पाहिला. तिची भीती आता अभिमानात बदलली आहे. काश्मीरमध्ये आपल्या मुलाला स्वतःच्या कुटुंबासारखे प्रेम देणारे लोक मिळालेत, यावर आता त्याच्या आईचा विश्वास बसला आहे.
मृतदेह मिळणे म्हणजे कुटुंबाच्या प्रतीक्षेचा अंत
रेस्क्यू ऑपरेशन प्रत्येक वेळी कुणाचे तरी प्राण वाचवून संपत नाही. अनेकदा फक्त मृतदेहाचा शोध घ्यावा लागतो. अशा वेळी यश म्हणजे जीव वाचवणे नसून, कुटुंबाला आपल्या माणसाचे शेवटचे दर्शन घडवून देणे अन् अंत्यसंस्कार करण्याची संधी देणे असते.
मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणे शक्य नसले, तरी मृतदेह शोधून कुटुंबाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवता येते, हेच या कामातील सर्वात मोठे मानवी मूल्य असल्याचे तो मानतो.
काश्मीरच्या तरुणांचा उत्साह अन् वास्तव
काश्मीरमधील तरुणांच्या जिद्दीचेही हमझा कौतुक करतो. अपघाताची बातमी मिळताच स्थानिक तरुण मदतीसाठी धावून येतात. काहींना पोहताही येत नाही, तरीही भावनेच्या भरात ते नदीकाठी पोहोचतात.
पण योग्य प्रशिक्षणाशिवाय पाण्यात उतरणे जीवावर बेतू शकते. मदतीची भावना जितकी महत्त्वाची आहे, तितकेच योग्य प्रशिक्षण अन् साधने असणे गरजेचे आहे, असा सल्ला तो अनुभवातून देतो.
SDRF मध्ये संधी अन् आधुनिक उपकरणांची अपेक्षा
हमझाचे हे काम पाहून त्याला 'राज्य आपत्ती प्रतिसाद दलात' (SDRF) काम करण्याची संधी द्यावी आणि त्याला आधुनिक डायव्हिंग साधने पुरवावीत, अशी मागणी सोशल मीडियावर नागरिक करत आहेत.
प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत मदत किंवा ओळख मिळालेली नाही. सरकारी व्यवस्थेत काम करायला मिळाले तर योग्य उपकरणांच्या मदतीने हे काम अधिक सुरक्षितपणे अन् प्रभावीपणे करता येईल, असे त्याला वाटते.
पण सरकारी नोकरी ही त्याच्या मोहिमेची अट नाही! नोकरीमुळे चांगली साधने अन् यंत्रणा मिळेल, पण नोकरी नाही मिळाली तरी आपले काम कधीच थांबणार नाही, हे त्याने स्पष्ट केले आहे.
अखंड चालणारा जीवनप्रवास
हमझा शेखची कथा ही एका रेस्क्यू पुरती मर्यादित नाही. लहानपणीच्या कौटुंबिक दुर्घटनेतून सुरू झालेला हा प्रवास आज मानवतेच्या मोठ्या सेवेत बदलला आहे. मुलाखत संपल्यावरही त्याला थांबायला वेळ नव्हता. तो लगेचच दुसऱ्या एका रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघण्याच्या तयारीत होता; कारण नदीकाठी काही कुटुंबे त्याची वाट पाहत होती.
चिनाबचे पाणी कधी शांत होईल अन् कधी उफाळून येईल, हे कुणीच सांगू शकत नाही. पण डोड्याच्या या तरुणाने आपला निर्णय घेतला आहे, जेव्हा जेव्हा कुणाचा तरी प्रिय माणूस पाण्यात गायब होईल, तेव्हा तो सर्व शक्तीनिशी त्याला शोधण्यासाठी नदीत उतरत राहील.