अरबी समुद्रात मोठी कारवाई; ३ हजार कोटींचे ड्रग्स जप्त, ५ पाकिस्तानी नागरिक ताब्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 42 m ago
अरबी समुद्रात ३ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; ५ पाकिस्तानी नागरिक ताब्यात
अरबी समुद्रात ३ हजार कोटींचे ड्रग्स जप्त; ५ पाकिस्तानी नागरिक ताब्यात

 

अहमदाबाद 

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) एका संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. लक्षद्वीपजवळ एका इराणच्या बोटीवरून ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ५२६ किलो मेथामफेटामाइन आणि हेरॉइन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

संयुक्त कारवाई आणि ५ पाकिस्तानी जण ताब्यात

गुप्त माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने समुद्र आणि हवाई सर्वेक्षण करत लक्षद्वीपच्या पश्चिमेस एका संशयास्पद नौकेचा पाठलाग करून ती ताब्यात घेतली. या कारवाईदरम्यान नौकेवर कार्यरत असलेल्या पाच पाकिस्तानी नागरिकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेला माल उच्च दर्जाचे मेथामफेटामाइन आणि हेरॉइन आहे. या नौकेला, तिच्यावरील खलाशांना आणि जप्त केलेल्या ड्रग्सला पुढील कायदेशीर कारवाईसाठी सशस्त्र सुरक्षेत मुंबईत आणण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स सिंडिकेटचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी आणि सागरी मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.