मलिक असगर हाशमी
मार्केटिंग आणि ब्रँडिंगच्या जगात काही चेहरे कायम प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत करतात. पडद्यामागे राहून सूत्रे हलवत संपूर्ण उद्योगाची दिशा बदलण्याची ताकद या लोकांमध्ये असते. कॉर्पोरेट जगतात अशा व्यक्तींना 'सायलेंट परफॉर्मर' किंवा 'किंगमेकर' म्हटले जाते. अशाच एका गप्पगार पण अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे नाव म्हणजे अफ्रीन जेब.
दिल्लीत राहणाऱ्या, चाळीशीत असलेल्या अफ्रीन यांनी स्वतःच्या कल्पक रणनीतीच्या जोरावर भारतातील 'कंटेंट क्रिएटर' जगताचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. सध्या त्या 'StudioBackdrops.com' च्या मुख्य विपणन अधिकारी (CMO) म्हणून धुरा सांभाळत आहेत. लहानपणी पुस्तकांमध्ये रमणाऱ्या एका साध्या मुलीपासून ते बड्या ब्रँड्सना मार्गदर्शन करणाऱ्या यशस्वी मार्केटिंग लीडरपर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
लेखिकेपासून ते 'सीएमओ'पदापर्यंतची गरुडझेप
अफ्रीन जेब यांना मिळालेले हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. त्यांच्या या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात जवळपास एका दशकापूर्वी झाली. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची अन् गोष्टी लिहिण्याची प्रचंड आवड होती. याच आवडीचे रुपांतर त्यांनी करिअरमध्ये केले आणि दहा वर्षांपूर्वी एक कंटेंट रायटर म्हणून कामाला सुरुवात केली.
मेहनत अन् निष्ठेच्या बळावर त्या पुढे कॉपीरायटर बनल्या आणि हळूहळू डिजिटल मार्केटिंगमधील खाचखळगे शिकून घेतल्या. गेल्या चार वर्षांपासून त्या 'StudioBackdrops.com' सोबत जोडलेल्या आहेत. सुरुवातीला त्या 'कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट' म्हणून कंपनीत रुजू झाल्या होत्या. पुढे मोठ्या प्रमाणावरील प्रॉडक्शन अन् शूटिंग प्रोजेक्ट्स सांभाळत त्यांनी स्वतःच्या कामाचा विस्तार केला. आज कंपनीच्या मार्केटिंग हेड आणि सीएमओ म्हणून व्हिज्युअल कंटेंट मार्केटला नवी दिशा देण्याचे काम त्या करत आहेत.
क्रिएटर इकॉनॉमीसाठी 'व्हिज्युअल-फर्स्ट' फॉर्म्युला
आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्क्रीनवर काय दिसते आणि ते किती खरे वाटते, याला खूप महत्त्व आले आहे. अफ्रीन यांच्या मते, त्यांच्या कंपनीने पहिल्या दिवसापासून 'व्हिज्युअल-फर्स्ट' हेच तत्त्व पाळले आहे. स्क्रीनवर दिसणारा रंग अन् प्रत्यक्ष हातातील वस्तूचा रंग यात तीळमात्र फरक राहू नये, यासाठी इंडस्ट्रियल कलर-कॅलिब्रेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
वेगवेगळ्या एजन्सींमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केल्यामुळे अफ्रीन यांच्याकडे मोठा अनुभव होता. जेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्मवर साध्या पोस्टची जागा व्हिडिओ कंटेंटने घेतली, तेव्हा त्यांनी तात्काळ कंपनीची रणनीती बदलली. केवळ क्रिएटर्सना वस्तू विकण्याऐवजी त्या स्वतः कॅमेऱ्यासमोर आल्या अन् व्हिडिओ बनवू लागल्या. कमी बजेटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हिडिओ कसे तयार करायचे, याचे धडेच आज त्यांची कंपनी नवोदित कलाकारांना देत आहे.
स्वस्त आणि महागड्या उपकरणांमधील दरी मिटवली
अनेक वर्षे बाजाराचा अभ्यास केल्यानंतर अफ्रीन यांच्या लक्षात एक मोठी अडचण आली. त्या काळात भारतीय कंटेंट क्रिएटर्ससमोर फक्त दोनच पर्याय असायचे: एकतर स्थानिक बाजारात मिळणारे स्वस्त अन् निकृष्ट दर्जाचे बॅकड्रॉप्स वापरणे किंवा परदेशातून प्रचंड महागडे पर्याय मागवणे. लहान आणि नवोदित क्रिएटर्ससाठी हे दोन्ही पर्याय परवडणारे नव्हते.
हीच दरी मिटवण्याचे काम 'StudioBackdrops' ने केले. अफ्रीन यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने उच्च दर्जाचे बॅकड्रॉप्स अगदी परवडणाऱ्या दरात थेट भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवले. प्रत्येक उत्पादनाची अचूक अन् प्रामाणिक माहिती देऊन त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. आज हाच विश्वास कंपनीची सर्वात मोठी ताकद बनला आहे.
प्रत्येक बजेटसाठी स्वदेशी ब्रँडची निर्मिती
बॉलीवूडच्या एखाद्या मोठ्या चित्रपट संचाची गरज अन् घराच्या कोपऱ्यात बसून व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटरची गरज यात मोठा फरक असतो. ही गरज ओळखून अफ्रीन यांनी व्यावसायिक स्टुडिओपासून ते स्वतंत्र काम करणाऱ्या कलाकारांपर्यंत प्रत्येकासाठी वेगळी उत्पादन श्रेणी तयार केली.
किंमत काहीही असली तरी गुणवत्तेशी तडजोड करायची नाही, हा नियम कडकपणे पाळला गेला. आज त्यांच्याकडे AriesX, Indus, Backdrops4ever आणि Baroque Studio सारखे अनेक लोकप्रिय सब-ब्रँड्स आहेत. कंपनीतील संपूर्ण टीम ही व्हिज्युअल इंडस्ट्रीमधूनच आलेली असल्यामुळे त्यांना मोठ्या फिल्म प्रॉडक्शनपासून ते नवीन युट्यूबर्सच्या अडचणी चांगल्या प्रकारे समजतात.
'इंडस पेपर्स'ने जिंकली क्रिएटर्सची मने
आजकालच्या बऱ्याच कंपन्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी भंपक जाहिरातींचा आधार घेतात. परंतु, अफ्रीन यांचा भर कायम ग्राहकांचे समाधान अन् तोंडी प्रसिद्धीवर राहिला आहे.
२०२३ मध्ये कंपनीने 'इंडस पेपर्स' नावाचे एक नवे उत्पादन बाजारात आणले. कोणतीही अतिशयोक्ती न करता, केवळ भारतीय ओळख अन् गुणवत्तेच्या जोरावर त्याची जाहिरात केली गेली. खरेखुरे फोटो अन् व्हिडिओ दाखवून ग्राहकांपर्यंत उत्पादन पोहोचवले गेले. आधीच विश्वास बसलेला असल्यामुळे भारतीय क्रिएटर्सनी या उत्पादनाला डोक्यावर घेतले. या यशानंतर पुढील वर्षी आणलेल्या 'इंडसलाईट'लासुद्धा बाजारात उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रत्यक्ष चाचणी म्हणजेच खरा शोध!
बाहेरच्या माणसाला वाटू शकते की फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीच्या साहित्यात नवीन काय शोधणार? पण अफ्रीन यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्यासाठी संशोधन म्हणजे पुस्तकी ज्ञान नसून ग्राहकांच्या अडचणींवर प्रत्यक्ष उपाय शोधणे होय!
कंपनीच्या वेबसाईटवर कोणतेही नवे उत्पादन विकायला ठेवण्याआधी अफ्रीन स्वतः त्याची कडक चाचणी घेतात. त्यांच्या मंजुरीनंतरच इतर तज्ज्ञ त्याची बारकाईने तपासणी करतात. उत्पादनांची माहिती प्रामाणिकपणे ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हाच आजच्या काळातील सर्वात मोठा शोध असल्याचे त्या मानतात. खरेदी करण्याआधीच ग्राहकाला ते उत्पादन कसे वापरावे हे कळावे, यासाठी शैक्षणिक व्हिडिओ आणि ट्युटोरियल्ससुद्धा उपलब्ध करून दिले जातात.
लहान शहरांमधून येतेय क्रिएटर्सची नवी लाट!
सोशल मीडियाचे जग वेगाने बदलत आहे. आता प्रेक्षक कृत्रिम किंवा दिखाऊ गोष्टींपेक्षा वास्तविक आयुष्याशी जोडलेल्या गोष्टींना जास्त पसंती देत आहेत. अशा प्रकारचा कंटेंट बनवण्यासाठी मोठ्या सेटची नाही, तर साध्या अन् नैसर्गिक वातावरणाची गरज असते. म्हणूनच आज भारतातील टियर-२, टियर-३ शहरे आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नवीन क्रिएटर्स पुढे येत आहेत. रोजची नोकरी किंवा कष्टाची कामे करत हे तरुण आवडीपोटी व्हिडिओ बनवत आहेत.
प्रेक्षकसुद्धा त्यांच्या या साधेपणाला डोक्यावर घेत आहेत. येत्या काळात मोठा स्टुडिओ म्हणजे प्रचंड खर्च किंवा मोठी जागा असणार नाही, तर जिथे बसून एक उत्तम गोष्ट सांगता येते, ती प्रत्येक जागा हाच एक स्टुडिओ असेल! आज अफ्रीन जेब या नव्या क्रिएटर क्रांतीच्या मुख्य सूत्रधार बनल्या आहेत. कल्पकता, पारदर्शकता आणि क्रिएटर्सच्या गरजांची योग्य पारख यांच्या जोरावर त्यांनी असा एक मंच उभारला आहे, जो देशातील प्रत्येक नवोदित कलाकाराच्या स्वप्नांना बळ देत आहे!