न्युयॉर्क
शेजारी देशातून चालणारा दहशतवाद ही भारताची सर्वात मोठी चिंता असून, मित्रदेशांनी याकडे पूर्ण लक्ष न दिल्यास त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतो, असे स्पष्ट मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८१ व्या अधिवेशनादरम्यान न्युयॉर्कमधील 'आशिया सोसायटी'त आयोजित एका विशेष संवादात ते बोलत होते. अमेरिकेचे माजी मुत्सद्दी डॅनियल रसेल यांनी या चर्चेचे संचालन केले. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही महिन्यांत वाढलेल्या जवळीकीच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
प्रत्येक देशाच्या संवेदनशीलतेचा सन्मान व्हायला हवा, असे सांगत जयशंकर म्हणाले की, भारतासाठी दहशतवादाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दशकांपासून जाणीवपूर्वक आणि धोरणात्मकरीत्या एका शेजारी देशाकडून भारताला ज्या प्रकारच्या दहशतवादाचा सामना करावा लागला आहे, तसा अनुभव जगभरातील फार कमी देशांना आला असेल.
"जेव्हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मुद्द्यावर भागीदार देशाकडून पुरेशी समज, प्रशंसा किंवा सहानुभूती दाखवली जात नाही, तेव्हा त्यामुळे समस्या निर्माण होतात," असे सांगत त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवर याचा प्रभाव पडत असल्याचे स्पष्ट केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या प्रशासनाची सुरुवात झाल्यापासून अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. गतवर्षी भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानात 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते. दरम्यान, अमेरिकेकडून भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला जात असला तरी भारताने तो सातत्याने फेटाळून लावला आहे. भारत-अमेरिका संबंधांचा भविष्यातील प्रवास हा या मुद्द्यांवरील वास्तवावर अवलंबून असेल, असे जयशंकर यांनी नमूद केले.