नवी दिल्ली
भारतीय लोकशाही चैतन्यशील ठेवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भाजपने आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी माध्यमांचा बदलता प्रवास आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी २००१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी निवड होण्यापूर्वी महिला पत्रकारांच्या गटाने मिठाईसाठी गळाच पकडल्याचा रंजक किस्साही सांगितला.
सरकारचे प्रमुख म्हणून २५ वर्षे पूर्ण केल्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, २००१ मध्ये मी गुजरातचा मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती पक्षातील केवळ काही वरिष्ठ नेत्यांनाच होती. त्यावेळी महिला पत्रकारांचा एक मोठा गट माझ्या खोलीत आला आणि त्यांनी थेट मिठाईची मागणी केली. मी याबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगूनही त्यांनी मला खोटे बोलत असल्याचे सुनावले आणि त्यांची माहिती अगदी अचूक निघाली. पुढे माझ्या शपथविधी सोहळ्याला अनेक पत्रकार मित्र स्वतःच्या खर्चाने आणि प्रेमापोटी उपस्थित राहिले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. सणासुदीच्या काळात कुटुंबापासून दूर राहून बातम्या देणाऱ्या पत्रकारांच्या निष्ठेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
माध्यमांशी आपले जुने आणि नैसर्गिक नाते असल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, १९९० च्या दशकात दोन मोठ्या यात्रांच्या माध्यम व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा प्रेस रिलीज पाठवण्यासाठी फॅक्स मशीन शोधावे लागत असे आणि दिल्लीतील अशोका रोड कार्यालयातील दिवाळी मिलन कार्यक्रमात मी पत्रकारांसाठी खुर्च्या लावून स्वागत करत असे. आज काळ पूर्णपणे बदलला असून मोठ्या ओबी व्हॅनची जागा मोबाईल फोनने घेतली आहे. प्रत्येकाकडे स्वतःचे चॅनेल आणि पॉडकास्ट उपलब्ध झाले आहेत. पूर्वी प्रत्येक गल्लीत सचिन तेंडुलकरच्या खेळावर भाष्य करणारे क्रिकेट तज्ज्ञ भेटायचे, आता प्रत्येक बातमीचे विश्लेषण करणारे तज्ज्ञ गल्लोगल्ली पाहायला मिळतात, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
आपल्या देशात जितकी तोंडे तितक्या गोष्टी असतात आणि हेच वैविध्यपूर्ण विचार आपली लोकशाही जिवंत ठेवतात, असे मोदी म्हणाले. अपघात, भूकंप किंवा पुरासारख्या संकटात जिथून संपूर्ण जग दूर पळते, तिथे जीवाची पर्वा न करता पोहोचणाऱ्या फिल्ड रिपोर्टर्सच्या समर्पणाचे आपण नेहमीच चाहते राहिलो आहोत, असे त्यांनी नमूद केले. पत्रकारांचे संपूर्ण आयुष्य डेडलाईनभोवती फिरत असते, त्यामुळे २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची सरकारची डेडलाईन पूर्ण करण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.