मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) ३ ऑक्टोबरपासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र दिवाणी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षाही स्थगित करण्यात आल्या असून, सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल, असे आयोगाने सोमवारी स्पष्ट केले.
औषध निरीक्षक परीक्षेतील कथित प्रश्नपत्रिका लीक प्रकरण आणि एकूणच परीक्षांच्या गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. अनेक विद्यार्थी संघटना, पालक आणि राजकीय प्रतिनिधींनी ३ ऑक्टोबरची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती MPSC कडे केली होती. वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती सध्या परीक्षा प्रणालीचा अभ्यास करत असून, तिच्या शिफारसी लवकरच सादर अपेक्षित आहेत.
यासोबतच आयोगाने महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. २०२५ च्या मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाबाबत अनेक विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवले होते, ज्यामुळे संपूर्ण निकाल प्रक्रियेला थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.