भुवनेश्वर
ओडिशामध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने गंभीर वळण घेतले आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील परिस्थिती बिकट असून, प्रशासनाने लो-लाइंग भागातील ९५ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या (SEOC) माहितीनुसार, बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, केओंझार आणि केंद्रपाडा या सहा जिल्ह्यांतील ५२ ब्लॉक्समधील ५०३ गावे पुराच्या पाण्याखाली आहेत. या भीषण पुरामुळे सुमारे २.७० लाख नागरिक बाधित झाले आहेत. वैतरणी, ब्राह्मणी, जलका आणि बुधबलंगा या नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सुवर्णरेखा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बालासोरमधील चिंता वाढली आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री सुरेश पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित नागरिकांसाठी २२६ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये शिजवलेले अन्न, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि लहान मुले, गरोदर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी राज्य सरकारने ११८ आपत्ती प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. काही नद्यांमधील पाणीपातळी ओसरत असली तरी ती अद्याप धोक्याच्या खुणेजवळ असल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. केओंझार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेने राष्ट्रीय महामार्ग-४९ वरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचा इशारा दिला असून, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.