आपल्या रिक्षात प्रवाशांना VIP ट्रिटमेंट देणारे हबीब चाचा

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 33 m ago
मुंबईतील प्रसिद्ध रिक्षाचालक हबीब शेख
मुंबईतील प्रसिद्ध रिक्षाचालक हबीब शेख

 

भक्ती चाळक

रस्त्यावरून फिरताना एखाद्याच्या रिक्षात तुम्हाला मोफत पिण्याचे गार पाणी आणि बिस्किटे मिळाली तर? तेही प्रत्येक मिनिटाचा हिशोब पैशात केल्या जाणाऱ्या मुंबईसारख्या शहरात. ऐकायला थोडे आश्चर्य वाटेल, पण ही अजिबात कपोलकल्पित गोष्ट नाही. 

मीटर पडताच प्रवाशांशी हिशोब सुरू करणाऱ्या या शहरात एक अशी रिक्षा आहे, जिची कमान एका संवेदनशील माणसाच्या हातात आहे. हबीब शेख असे या अवलियाचे नाव. ‘आवाज-द-व्हॉईस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या माणूसपणाची कहाणी सांगितली.

इमिटेशन ज्वेलरीच्या व्यवसायातून सुरुवात करणाऱ्या हबीब यांचा धंदा लॉकडाऊनच्या काळात पार बसला. खिशात एक रुपयाही उरला नव्हता. अशा हताश परिस्थितीत त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. पण सलग चार दिवस रस्त्यावर भटकूनही एकाही दुकानदाराने त्यांच्याकडून पाण्याची बाटली घेतली नाही. परिस्थितीला वैतागून त्यांनी हा धंदा सोडायचा विचार केला.

मांजरीच्या पिल्लाने बदलला दृष्टीकोन 
एका संध्याकाळी सातच्या सुमारास यशराज स्टुडिओजवळ अंधारात एका कारखाली मांजराचे लहान पिल्लू जीव तोडून ओरडत होते. आजूबाजूला त्याची आई नव्हती. गाड्यांच्या चाकाखाली येऊन ते मरून जाईल या भीतीने हबीब यांनी पुढे-मागे न बघता त्या पिल्लाला एका पिशवीत घातले अन् थेट घरी आणले.

त्या भुकेल्या पिल्लाला त्यांनी प्रेमाने दूध पाजले. पोट भरल्यावर ते पिल्लू शांत झोपले. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी सकाळी जेव्हा हबीब पाण्याच्या बाटल्या विकायला बाहेर पडले, तेव्हा दुपारपर्यंत त्यांच्या २० बाटल्या हातोहात विकल्या गेल्या. 

या अद्भुत प्रसंगाची आठवण सांगताना हबीब म्हणतात, “चार दिवस भटकून मला एकही गिऱ्हाईक भेटत नव्हता, अन् त्या दिवशी दुपारीच २० बॉक्स विकले गेले. मला समजून आले, ही त्या मांजराच्या पिल्लाचीच दुआ आहे. तिथून माझा दृष्टीकोन बदलला.”

सायकल, ॲक्टिव्हा ते थेट तीन चाकी रिक्षा
हबीब यांचा पाण्याचा धंदा हळूहळू मूळ धरू लागला. सुरुवातीला सायकलवरून पाणी विकणारे हबीब पुढे ॲक्टिव्हावर आले. धंदा आणखी वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी चारचाकी टेम्पो घेण्याचा विचार केला, पण शोरूममधील ८ लाखांची किंमत ऐकून त्यांनी तो निर्णय बदलला.

हबीब यांच्याकडे कसाबसा साचलेला २ लाखांचा निधी होता. त्यांनी ऑटो रिक्षा शोरूम गाठली. तिथेही ४ लाखांचा आकडा समोर आला. निराश होऊन परतणाऱ्या हबीब यांना शोरूमच्या मालकाने हाक मारली आणि २ लाख रोख अन् उरलेल्या २ लाखांचे कर्ज करून रिक्षा हातात दिली. ही रिक्षाच पुढे जाऊन हबीब यांच्या आयुष्याची खरी ओळख बनली.

पहिल्याच भाड्याने शिकवलेला धडा
रिक्षा हातात आल्यावर सुरुवातीला ते पाण्याच्या बाटल्यांच्या डिलिव्हरीसाठी ती वापरत असत. अवघ्या दोन तासांत काम संपल्यामुळे उरलेल्या वेळेत काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. लोखंडवाला येथील इन्फिनिटी मॉलजवळ उभे असताना एका महिलेने त्यांना डी. एन. नगरला सोडण्याची विनंती केली.

रिक्षा चालवण्याचा पहिलाच दिवस आणि जास्त काही माहिती नसल्यामुळे हबीब यांनी येण्यास नकार दिला. परंतु त्या महिलेच्या विनंतीचा मान राखत ते तयार झाले. त्या महिलेने त्यांना रिक्षाचा मीटर कसा वाचायचा, मॅपवर रस्ता कसा शोधायचा हे समजावून सांगितले. भाडे ४० रुपये झाले असताना, त्या महिलेने पहिल्या दिवसाचे कौतुक म्हणून हबीब यांच्या हातावर १०० रुपयांची नोट ठेवली.

त्या प्रसंगाबद्दल हबीब सांगतात, “त्या मॅडमने दिलेले १०० रुपये मी खिशात टाकायच्या आतच दुसरे गिऱ्हाईक आले. त्या दिवसापासून, रस्त्यात कोणताही पशू-पक्षी किंवा गरजू माणूस दिसला, तर त्याच्या मदतीला धावून जायची, मी कसम खाल्ली.” 

मुंबईकरांसाठी VIP सर्व्हिस 
हबीब यांच्या रिक्षात बसणाऱ्या प्रवाशाचे स्वागत थेट मोफत थंड पाणी आणि बिस्किटांनी होते. एवढेच नाही तर रिक्षात मागच्या बाजूला भलामोठा तिरंगा देखील लावला आहे. लहानमोठ्या झाडांच्या कुंड्यांनी तर रिक्षालाआणखी देखणेपण येते. अनेकदा रिक्षावाले ज्या प्रवाशांना नकार देतात, त्यांना हबीब अत्यंत आदराने आपल्या रिक्षात बसवून घेतात. २५-३० रुपयांचे अगदी लहान भाडे असले तरी ते कधीच नाकारत नाहीत.

अंध व्यक्ती, गरोदर महिला, लहान बाळ असलेल्या माता आणि रुग्णालयात जाणाऱ्या वृद्धांना ते नेहमी प्रामाणिकपणे सेवा देतात. अनेकदा प्रवासी खूश होऊन त्यांच्या कार्यासाठी आर्थिक मदतीचा हात देतात. या पैशांमधून ते रिक्षामध्ये असलेल्या गरजेच्या इतर गोष्टींचा खर्च भागवतात आणि गरजवंतांना मदत देखील करतात.

हबीब यांचे प्राणीप्रेम 
हबीब यांच्या गाडीत प्रवाशांसोबतच मुक्या प्राण्यांसाठी कॅट फूड, डॉग फूड आणि औषधांचा साठा असतो. रात्री-अपरात्री एक्सीडेंट झालेल्या किंवा आजारी पडलेल्या कुत्र्या-मांजरांना ते स्वतःच्या खर्चाने प्राण्यांच्या रुग्णालयात नेतात. 

एका महिला डॉक्टरने तर हबीब यांचे हे निष्पाप प्रेम पाहून त्यांच्यामार्फत येणाऱ्या प्राण्यांवर मोफत उपचार करायचे ठरवले. प्राणीप्रेमाबद्दल बोलताना हबीब भावूक होऊन म्हणतात, “माणसाला त्रास झाला तर तो रात्री १ वाजतासुद्धा दवाखान्यात धावू शकतो. पण या मुक्या जनावरांचे काय? ते फक्त आपल्याकडे आशेने बघतात की कुणीतरी बिस्कीट किंवा दूध देईल. मुक्या जनावरांना मदत करणे आपलेच कर्तव्य आहे.”

बॉलिवूडमध्येही हबीब यांची चर्चा 
हबीब यांच्या या अनोख्या रिक्षाची आणि त्यांच्या कार्याची चर्चा आता थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. अभिनेत्री अदा शर्मा असो किंवा तारक मेहता का उल्टा चश्मा फेम रीटा रिपोर्टर (प्रिया आहुजा), अशा अनेक कलाकारांनी हबीब यांच्या रिक्षातून प्रवास केला आहे आणि त्यांनी व्हिडीओ देखील बनवलेत.

रिक्षातील मोफत सोयी-सुविधा आणि प्राण्यांबद्दलचे प्रेम पाहून हे कलाकार थक्क होतात. अनेक प्रवासी हबीब यांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे आज हबीब हे मुंबईतील अत्यंत लोकप्रिय रिक्षाचालक बनले आहेत.
 

अनाथ नासिरला आधाराची छत्रछाया
हबीब यांचे समाजकार्य फक्त प्राण्यांपर्यंत मर्यादित नाही. गावातून मुंबईत आलेल्या आणि वडिलांचे छत्र हरपलेल्या नासिरला त्यांनी वाईट संगतीपासून वाचवले. त्याला स्वतःसोबत ठेवले, रोज नाश्ता-जेवण दिले आणि कामाचा मोबदला म्हणून रोज २०० रुपये देऊन त्याला स्वावलंबी बनवले.

नासिरबद्दल बोलताना हबीब सांगतात, “मी कोणाला खायला घालणारा मोठा माणूस नाही, हे सर्व करण्याची ताकद ईश्वरच देतो. मी फक्त एक जरिया आहे. ज्या मुलाला वडील नाहीत, त्याच्या डोक्यावर हात ठेवणे हे खूप मोठे सवाबचे काम आहे.”

प्राण्यांसाठी २४ तास वैद्यकीय सेवा
हबीब यांना स्वतःचा मोठा व्यवसाय उभारायचा नाहीय, तर त्यांना रात्रीच्या वेळी जखमी होणाऱ्या प्राण्यांसाठी एक छोटेसे शेल्टर आणि २४ तास चालणारे क्लिनिक सुरू करायचे आहे. यासाठी १५ हजार रुपयांच्या भाड्याची जागा घेऊन एक डॉक्टर ठेवण्याची त्यांची योजना आहे.

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात माणसाला एकमेकाकडे पाहायला वेळ नाही. परंतु या धावपळीच्या युगात हबीब मोठ्या पुण्याचं काम करत आहेत. “दुसऱ्यांना मदत करण्यात मिळणारी दुआ हीच माझी खरी कमाई आहे,” असे मानणाऱ्या हबीब यांचे कार्य खरोखरच आदर्शवत आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter