मुंबई
विमल इलायचीच्या (Vimal Elaichi) जाहिरातीत झळकल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) या तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस (Show-Cause Notice) बजावली आहे. हा प्रचार अप्रत्यक्ष किंवा सरोगेट (Surrogate) स्वरूपाचा असून, याद्वारे प्रतिबंधित पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा प्रचार केला जात असल्याचा प्राथमिक दावा एफडीएने केला आहे.
एफडीएच्या मुंबई विभागाकडून ११ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीशीनुसार, 'विमल इलायची'च्या जाहिरातीमुळे ब्रँडची ओळख थेट विमल पान मसालाशी जोडली जात आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या या जाहिराती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट, २००६ आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करत आहेत. अभिनेत्यांनी या जाहिरातींमधील सहभाग तातडीने थांबवावा आणि सोशल मीडियावरून सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाकावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
जाहिरात नेमकी कशा स्वरूपाची आहे आणि 'विमल इलायची' हे बाजारात स्वतंत्रपणे विकले जाणारे उत्पादन आहे की पान मसाल्याच्या प्रचारासाठी वापरले जाणारे सरोगेट माध्यम आहे, याबाबत पुरावे देण्याचे आदेश अभिनेत्यांना देण्यात आले आहेत. तसेच करार आणि पेमेंटच्या तपशिलांसह सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत उत्तर न मिळाल्यास किंवा उत्तर असमाधानकारक वाटल्यास पुढील कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.