MODI NEW ZEALAND VISIT: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे संबंध अधिक दृढ होणार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
न्यूझीलंड पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन आणि पंतप्रधान मोदी
न्यूझीलंड पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन आणि पंतप्रधान मोदी

 

नवी दिल्ली 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या आठवड्यात न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींचा न्यूझीलंडचा हा पहिलाच अधिकृत दौरा असणार आहे.

आर्थिक भागीदारीला मिळणार गती

पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी या दौऱ्याचे स्वागत करताना सांगितले की, भारत ही जगातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे न्यूझीलंडच्या आर्थिक समृद्धीसाठी भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एप्रिल महिन्यात भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 'मुक्त व्यापार करारावर' (Free Trade Agreement - FTA) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. या करारामुळे दोन्ही देशांमधील रोजगार निर्मिती, निर्यातीत वाढ आणि आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.

व्यापार कराराचे महत्त्व

या मुक्त व्यापार करारामुळे न्यूझीलंडच्या उत्पादनांना आणि सेवांना १४० कोटी लोकांची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच, भारतासाठी हा करार पॅसिफिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ करणारा ठरेल. सध्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे २.४ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे. माहिती तंत्रज्ञान (IT), पर्यटन आणि व्यावसायिक सेवांमध्ये दोन्ही देश एकमेकांचे मोठे भागीदार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे या संबंधांना अधिक बळकटी मिळणार असून, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी अधिक प्रगल्भ होणार आहे.