इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८२ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मंगळवारी झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या ८६ धावांत गारद झाला आणि गुजरातने सलग पाचवा विजय नोंदवला.
रबाडा आणि होल्डरचा भेदक मारा
१६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांच्या अचूक माऱ्यापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. मोहम्मद सिराजने इम्पॅक्ट सब ट्रॅव्हिस हेडला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यानंतर रबाडाने अभिषेक शर्मा (६) आणि इशान किशन (११) यांना तंबूचा रस्ता दाखवला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रबाडाने आपला तिसरा बळी घेत हैदराबादची अवस्था ४ बाद ३२ अशी केली.
रबाडाची षटके संपल्यानंतर जेसन होल्डरने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडले. हेनरिक क्लासेन (१४) आणि नितीश कुमार रेड्डी (२) यांना होल्डरने बाद केले. प्रसिद्ध कृष्णानेही दोन बळी घेत गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक १९ धावा केल्या. १४.५ षटकांतच हैदराबादचा डाव ८६ धावांवर संपुष्टात आला.
सुदर्शन आणि सुंदरची अर्धशतके
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात अडखळत झाली होती. प्रफुल्ल हिंगेच्या गोलंदाजीवर कर्णधार शुभमन गिल (५) आणि जोस बटलर (७) स्वस्तात बाद झाले. अवघ्या ३४ धावांत २ गडी बाद झाल्यानंतर साई सुदर्शनने एका बाजूने डाव सावरला. त्याने ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
सुदर्शनला वॉशिंग्टन सुंदरची उत्तम साथ मिळाली. सुंदरने ३३ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली, ज्यामुळे गुजरातला १६८ धावांचा टप्पा गाठता आला. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगेने २ तर पॅट कमिन्सने १ बळी घेतला.