लंडन
लंडन येथे सुरू असलेल्या एफआयएच प्रो लीगमध्ये भारतीय हॉकी संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा पराभव केला. या विजयामुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तानविरुद्ध असलेला भारताचा अपराजित राहण्याचा सिलसिला कायम राहिला आहे.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला अहमद नदीमने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करत पाकिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, २२ व्या मिनिटाला अभिषेकने फिल्ड गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर २४ व्या मिनिटाला निलाकांता शर्माने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत भारताकडे १ गोलची आघाडी होती.
दुसऱ्या सत्रात भारतीय संघाने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. ४० व्या मिनिटाला सुखजित सिंगने फिल्ड गोल केला, तर त्यानंतर राजिंदर सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करत भारताची आघाडी ४-१ अशी वाढवली. शेवटच्या सत्रात पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अबू महमूदने ५३ व्या मिनिटाला आणि मोईन शकीलने ६० व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. मात्र, पाकिस्तानला भारताची आघाडी मोडून काढता आली नाही आणि भारताने हा सामना ४-३ ने जिंकला. भारतीय संघ आता लंडन लेगमध्ये शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध आपला पुढील सामना खेळणार आहे.