दुबई
महिला टी-२० आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या आगामी पर्वाचे वेळापत्रक आशियाई क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केले आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून दुबईमध्ये सुरू होणार असून, यात एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्वात हाय-व्होल्टेज मानला जाणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या स्पर्धेचे सामने २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत पार पडतील. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँग आणि थायलंडचे संघ आमनेसामने असतील. स्पर्धेत एकूण दोन गट करण्यात आले असून, 'गट अ' मध्ये सात वेळा चॅम्पियन ठरलेला भारत, पाकिस्तान, थायलंड, हाँगकाँग आणि चीन हे संघ आहेत. तर 'गट ब' मध्ये गतविजेता श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे स्वरूप साखळी पद्धतीचे (Round-robin) असून, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने १० आणि ११ सप्टेंबर रोजी होतील, तर स्पर्धेचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत चार वेळा वनडे आणि तीन वेळा टी-२० स्वरूपात आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. गतविजेता श्रीलंका आणि २०१8 मधील विजेते बांगलादेश हे संघ देखील या स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज आहेत.