ग्लासगो
ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या दिमाखदार समारोपानंतर भारताने अधिकृतपणे २०३० च्या शतकोत्सव राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद स्वीकारले आहे. रविवारी ओव्हो हायड्रो येथे झालेल्या समारोप सोहळ्यात ग्लास्गोकडून राष्ट्रकुल खेळांची मशाल व ध्वज भारताकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भारताच्या वतीने प्राचीन दर्शन, समकालीन कला आणि सांस्कृतिक समृद्धीचे सादरीकरण करत संपूर्ण जगाला अहमदाबादमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
प्रिन्स एडवर्ड यांनी औपचारिकपणे खेळांची सांगता जाहीर केली. बॉक्सर जस्मिन लंबोरियाने समारोप सोहळ्यात भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर ग्लास्गोच्या लॉर्ड प्रोवोस्ट जॅकलीन मॅक्लारेन यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी. उषा, नीरज चोप्रा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे ध्वज सुपूर्द केला.
भारतीय सांस्कृतिक सादरीकरणाची सुरुवात 'वसुधैव कुटुंबकम्' या प्राचीन भारतीय तत्वज्ञानावर आधारित तीन टप्प्यांमध्ये झाली. अभिनेत्री मानुषी छिल्लरच्या नेतृत्वाखाली 'वंदे मातरम्'च्या १५० व्या वर्षानिमित्त विशेष नृत्य सादर करण्यात आले. संगीतकार शंकर महादेवन आणि त्यांच्या मुलांनी देशभक्तीपर गीतांची मैफलज जमवली.
या सोहळ्यात भारताचे प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्मा आणि स्कॉटिश संगीतकार रॉस आन्स्ली यांच्यात एक अनोखी संगीत जुगलबंदी पाहायला मिळाली. या संगीताच्या माध्यमातून दोन प्राचीन संस्कृतींचा सुसंवाद साधण्यात आला. विशेष चित्रफितीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना अहमदाबादच्या विकासाची आणि संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. २०३० मध्ये होणाऱ्या या शतकोत्सव स्पर्धेसाठी आता संपूर्ण देश सज्ज होत आहे.