युजीन (अमेरिका)
अमेरिकेतील युजीन येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स U20 अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खेळाडूंनी संमिश्र पण आश्वासक कामगिरी केली आहे. भालाफेकपटू आशिष यादव आणि टी. धरणीधरण यांच्यासह डिस्कस थ्रोअर अमनत कंबोज यांनी आपापल्या प्रकारात दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
पुरुषांच्या भालाफेक प्रकारात १९ वर्षीय आशिष यादवने ६९.८७ मीटर लांब फेक करत ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावले, तर एकूण कामगिरीत तो दुसऱ्या स्थानी राहिला. दक्षिण आफ्रिकेचा फेव्हरेट खेळाडू जेन-हेन्ड्रीक हेयमान्सने ७६.०२ मीटर थ्रो करत ग्रुप बी मध्ये पहिले स्थान मिळवले. भारताचा दुसरा भालाफेकपटू टी. धरणीधरण याने ६८.०७ मीटर थ्रो करत अंतिम फेरीतील १२ वे आणि शेवटचे स्थान मिळवले.
महिलांच्या डिस्कस थ्रो प्रकारात भारताच्या अमनत कंबोजने ५२.५८ मीटरचा सीझन बेस्ट थ्रो करत ग्रुप ए मध्ये सहावे स्थान मिळवले. एकूण कामगिरीच्या बाबतीत तिने १२ वे स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. चीनच्या सु यिक्सिने ५८.०६ मीटर थ्रो करत प्रथम स्थान मिळवले आहे.
दरम्यान, पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीत मोगाली वेंकटरामने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, त्याने १ मिनिट ५२.८१ सेकंद वेळ नोंदवली. मात्र, युविन आनंदला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. तसेच भारताच्या ४×४०० मीटर मिश्र रिले संघाने पहिल्या फेरीतच स्पर्धेतून निरोप घेतला.